आठ वर्षे क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर त्याबाबतची संपूर्ण रक्कम बँकेकडे भरूनसुद्धा पुन्हा दोन वर्षांनी येणेबाकी असल्याचे दाखवून खातेदाराकडून मनमानी पद्धतीने वसुली करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला ग्राहक मंचाने चांगलेच फटकारले आहे. ‘बँकेने सर्व कायदेशीर नियम गुंडाळून पूर्वीच्या पठाणी कायद्याप्रमाणे वसुली केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवत यापुढे बँकेने खातेधारकाकडून वसुली न करता नुकसानभरपाई म्हणून त्यांना दहा हजार आणि तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये द्यावेत,’ असा आदेश दिला.
क्रेडिटकार्डचा वापर, त्याच्या वसुलीची कार्यपद्धती याबाबत खातेदाराला बँकेने काहीही माहिती दिलेले नाही. बँकेनेच खातेदाराला वेगवेगळी आमिषे दाखवून क्रेडिट कार्ड वितरित केल्याचे दिसून येत आहे. बँकेने दिलेली सेवा ही दोषपूर्ण असून खातेदार हे नुकसान भरपाईस पात्र ठरतात, असे निकालात नमूद करत ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य एस. एम. कुंभार यांनी खातेदाराला बँकेने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही नुकसान भरपाई एका महिन्याच्या आत न दिल्यास त्यावर नऊ टक्के व्याज आकारले जाईल, असे त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
पांडुरंग शंकर भोसले (रा. फ्लॅट नंबर ९, दुसरा मजला, साई समर्थ पार्क, वडगाव बुद्रुक) यांनी याबाबात ग्राहक मंचाकडे जुलै २०१० मध्ये तक्रार दाखल केली होती. भोसले यांनी भारतीय स्टेट बँकेकडून क्रेडिट कार्ड घेतले होते. त्यांनी २००१ ते २००८ दरम्यान क्रेडिट कार्डचा वापर केला. २००८ अखेर बँकेकडे दोन लाख नऊ हजार रूपये देऊन क्रेडिट कार्ड परत केले. बँकेने त्यांना काहीही देणे नसल्याचे सांगितले. त्यानंतर डिसेंबर २००९ मध्ये बँकेने भोसले यांना तुमच्या क्रेडिट कार्डवर २९ हजार रूपये रक्कम थकीत असल्याचे सांगून ते भरण्यास सांगितले. याबाबत भोसले यांनी बँकेला कायदेशीर नोटीस पाठविली तरी सुद्धा बँकेने वसुली थांबविली नाही. त्यामुळे भोसले यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ढोले पाटील रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी आणि नवी दिल्ली येथील ग्राहक सेवा केंद्राचे सहायक अध्यक्ष यांच्याविरुद्ध दावा दाखल केला. मंचाने बँकेला व ग्राहक सेवा केंद्राला नोटीस पाठवूनही ते हजर राहिले नाहीत.
तक्रारदार भोसले यांनी सादर केलेली सर्व कागपदत्रे पाहता त्यांनी प्रतीमहिना क्रेडिटकार्ड वापराचे पैसे परत दिले आहेत. तरीसुद्धा बँकेने अवास्तव व्याज आकारून खातेदाराकडून मनमानी वसुली केली आहे. त्याच बरोबर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानादेखील बँकेने खातेदाराला नोटीस पाठवून पैसे न भरल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे भोसले यांनी भीतीपोटी दोन वेळा २३ हजार रूपये भरले आहेत. खातेदाराने प्रामाणिकपणा दाखविला तरी सुद्धा बँकेने त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने वसुली केली असून बँकेने दिलेल्या सदोष सेवेमुळे खातेदाराला मानसिक, शारीरिक त्रास झाला आहे. त्यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत, असे मंचाने आदेशात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2013 रोजी प्रकाशित
खातेदाराकडून मनमानी पद्धतीने वसुली करणाऱ्या बँकेला ग्राहक मंचाने फटकारले
आठ वर्षे क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर त्याबाबतची संपूर्ण रक्कम बँकेकडे भरूनसुद्धा पुन्हा दोन वर्षांनी येणेबाकी असल्याचे दाखवून खातेदाराकडून मनमानी पद्धतीने वसुली करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला ग्राहक मंचाने चांगलेच फटकारले आहे. ‘बँकेने सर्व कायदेशीर नियम गुंडाळून पूर्वीच्या पठाणी कायद्याप्रमाणे वसुली केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवत यापुढे बँकेने खातेधारकाकडून वसुली न करता नुकसानभरपाई म्हणून त्यांना दहा हजार आणि तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये द्यावेत,’ असा आदेश दिला.

First published on: 02-04-2013 at 02:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consumer dias rebukes sbi