पिंपरी : कपडे धुतलेले दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पवना नदीत सोडणाऱ्या चिंचवडेनगर येथील विघ्नहर्ता क्‍लिअरन्स लॉन्ड्री अ‍ॅण्ड ड्रायक्‍लिनर्स सर्व्हिसेसच्या चालकावर गुन्हा दाखल केला. तसेच लॉन्ड्रीदेखील सील करण्यात आली आहे.

याबाबत महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विघ्नहर्ता क्‍लिअरन्स लॉन्ड्री अ‍ॅण्ड ड्रायक्‍लिनर्स सर्व्हिसेसचे स्वप्निल ससे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीत केजूबाई बंधारा येथे १६ जुलैला पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आला होता. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली होती.

हेही वाचा – रेल्वे स्थानकाचे रुप पालटणार! काय आहे अमृत भारत योजना?

या तक्रारीची पडताळणी केली. चिंचवडेनगर स्वप्निल ससे यांच्या मालकीच्या विघ्नहर्ता क्‍लिअरन्स लॉन्ड्री अ‍ॅण्ड ड्रायक्‍लिनर्स सर्व्हिसेस या आस्थापनेची तपासणी केली. त्यानंतर या लॉन्ड्रीमधून ड्रायक्‍लिनमधील कपडे धुतलेले दूषित पाणी हे कोणतीही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नदीत जात असल्याचे निदर्शास आले. त्यानुसार ससे यांना पालिकेने नोटीस बजाविली. त्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हाही दाखल केला आहे.

हेही वाचा – सावधान! पुण्यात डेंग्यूचा कहर सुरूच

लॉन्ड्रीची जागा पालिका कर्मचाऱ्याची

चिंचवडेनगर येथे ज्या जागेवर विघ्नहर्ता क्‍लिअरन्स लॉन्ड्री अ‍ॅण्ड ड्रायक्‍लिनर्स सर्व्हिसेस आहे, ती जागा महापालिकेच्या एका मुख्य लिपिकाची आहे. संबंधित लिपिक कर्मचारी महासंघाचा माजी पदाधिकारी आहे. त्यामुळे विना परवाना लॉन्ड्री चालविण्यासाठी जागा देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह काय कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.