पुणे : केंद्र शासनाच्या अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या हडपसर रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या स्थानक परिसरातील दळणवळण व्यवस्था सुधारावी, यासाठी उपाययोजना करण्याबाबतचे पत्र रेल्वे विभागाने वाहतूक पोलिसांना दिले आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या प्रवासी रेल्वे, मालवाहतूक गाड्या आणि अतिरिक्त रेल्वे गाड्यांमुळे या रेल्वे स्थानकावर ताण येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून हडपसर आणि खडकी या स्थानकांवरून दक्षिण व उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सोडण्यासाठीचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी हडपसर रेल्वे स्थानकाची अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून दख्खन एक्सप्रेस, मनमाड पॅसेंजर, निजामाबाद पॅसेंजर आदी गाड्या धावत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावरून सोडण्याचे नियोजनही करण्यात येत आहे. मात्र, प्रवाशांना अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

हडपसर परिसरातील जवाहरलाल नेहरू मार्केट, गाडीतळ, मगरपट्टा, बी. टी. कवडे रस्ता, फुरसुंगीकडे जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच हांडेवाडी, महंमदवाडी रस्त्यांवरही कोंडी होत असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. बनकर क्रीडा मैदानाकडून मगरपट्टा रस्त्याने विरुद्ध दिशेने अनेक वाहने मगरपट्टा साउथ गेट चौकात येतात. त्यामुळे तेथे कोंडी होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पोलिसांना याबाबत पत्र पाठविले आहे.

हडपसर रेल्वे स्थानक परिसराची दळणवळण व्यवस्था सुधारावी, यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र पाठविण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांकडून नियोजनही करण्यात येत आहे. प्रवाशांना सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनासोबत समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्ये रेल्वे, पुणे विभाग