बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाने खोटी बँक हमी देऊन एका ठेकेदाराने महापालिकेला फसवल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. हा ठेकेदार राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसचा सरचिटणीस असून त्यामुळे कारवाई होत नसल्याचाही आरोप मनसेने केला आहे.
महापालिकेच्या फसवणुकीसंबंधीची ही माहिती मनसेचे गटनेता वसंत मोरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, की दिनेश पंडितराव खराडे असे ठेकेदाराचे नाव असून त्यांनी हडपसर व परिसरातील अकरा कामांच्या निविदा भरून तेहेतीस लाखांची कामे मिळवली होती. महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या केडगाव (ता. दौंड) शाखेची बँक हमी या कामांसाठी दिली होती. त्याची शहानिशा करून त्याबाबत कळवावे असे पत्र महापालिकेने बँकेला दिल्यानंतर बँकेने दिलेल्या माहितीनुसार या अकरा निविदांपैकी चार कामांच्या निविदांसाठी देण्यात आलेली बँक हमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. बारा लाख ऐंशी हजार रुपयांच्या बँक हमीसाठी खोटी कागदपत्र, तसेच बनावट शिक्के तयार करून घेण्यात आल्याचेही उघड झाले आहे.
महापालिकेने महाराष्ट्र बँकेकडून बँक हमीबाबत माहिती मागवली असता अकरापैकी चार निविदांसाठी आम्ही गॅरेंटी दिलेली नाही. त्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे बँकेने महापालिकेला स्पष्टपणे कळवले होते. तसेच आम्ही ज्या चार बँक गॅरेंटी दिलेल्या नाहीत त्याबाबत बँकेची कुठलीही जबाबदारी असणार नाही याची नोंद घ्यावी, असेही बँकेने या पत्रात नमूद केले होते. त्यानंतरही संबंधित ठेकेदारावर कारवाई झालेली नाही. राजकीय दबावामुळे ही कारवाई होऊ शकली नाही, असाही आरोप मोरे यांनी केला.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेची आणि बँकेची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करा, असे पत्र मनसेतर्फे मंगळवारी आयुक्तांना देण्यात आले.