मार्केट यार्डातील स्वच्छतागृहांचे गाळ्यात रूपांतर

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात येणारे शेतकरी, घाऊक खरेदीदारांसाठी मार्केट यार्डातील प्रत्येक गाळ्यांच्या ओळीत शेवटी एक स्वच्छतागृह निर्माण करण्यात आले होते. मात्र, नऊ स्वच्छतागृहांचे व्यापारी गाळ्यात रूपांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या वीस वर्षांपासून या व्यापारी गाळ्यांमध्ये बेकायदा उपाहारगृह, भाजीपाला, फळे विक्रीचा व्यवसास सुरू होता.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक मधुकांत गरड यांनी रविवारी (२७ सप्टेंबर) बाजार आवाराला अचानक भेट दिली. भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विभागाची पाहणी त्यांनी केली. तेव्हा सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर व्यापारी गाळ्यांसाठी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बाजार आवाराची पाहणी केली. या प्रसंगी तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, विस्तार शाखा प्रमुख सतीश मोहिते आदी उपस्थित होते. गरड म्हणाले, मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागात ओळीने गाळे (पाकळीसारखा आकारात गाळ्यांची रचना) आहेत. प्रत्येक पाकळीच्या शेवटी स्वच्छतागृह उभे करण्यात आले होते. या स्वच्छतागृहांचे बेकायदा व्यापारी गाळ्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. संबधित गाळ्यांचा कोणताही भाडेकरार करण्यात आला नाही तसेच कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही.

गेल्या वीस वर्षांपासून स्वच्छतागृहांचा वापर व्यापारी गाळ्यांसाठी सुरू असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. भाडे वसुलीबरोबरच कायदेशीर कारवाईचा पर्याय समोर आहे, असे त्यांनी नमूद केले.

महिला शेतकरी निवासाचा वापर व्यापारासाठी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्केट यार्डात बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवासासाठी स्वतंत्र शेतकरी भवन उभे करण्यात आले होते. तेथे शेतक ऱ्यांसाठी निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. महिला शेतक ऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. महिला शेतकरी भवन सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकही महिला शेतकरी निवासासाठी आली नाही. त्यामुळे यापुढील या जागेचा वापर व्यापारी भवन म्हणून करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.