‘नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला यांसारख्या भारतीय विद्यापीठांनी जगाच्या शिक्षणव्यवस्थेवर एकेकाळी राज्य केले होते. या विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी बाहेरील देशातील विद्यार्थी येत होते. आता आपल्याकडील बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी का जावे लागते, याचा शिक्षणसंस्था आणि शिक्षणतज्ज्ञांनी अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे,’ असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी व्यक्त केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ मुखर्जी यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिम्बायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते. विद्यापीठाकडून दादा जे. पी. वासवानी आणि स्टॅंडफोर्ड विद्यापीठातील  डॉ. हरेष शहा यांना डि.लिट देण्यात आली.
या वेळी मुखर्जी म्हणाले,‘‘एकेकाळी जगातील शिक्षण विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतातील एकही विद्यापीठ जागतिक क्रमवारीत पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये गणले जाऊ नये, ही खेदाची बाब आहे. आपल्याकडील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये जागतिक क्रमवारीत स्थान मिळवण्याची आणि देशाला त्यांचे शैक्षणिक वैभव पुन्हा मिळवून देण्याची क्षमता आहे. आपल्याकडील बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी का जावे लागते, याचा विचार शिक्षणसंस्थांनी आणि तज्ज्ञांनी करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हाच शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे. विद्यार्थ्यांमधून उद्याचे सक्षम, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, संशोधक विकसित व्हावेत, यासाठी शिक्षणसंस्थांनी प्रयत्नशील असले पाहिजे.’’
 
सिम्बायोसिसच्या अकराव्या पदवीदान समारंभात ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, ३५ विद्यार्थ्यांना पीएच.डी., २ हजार ७०० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, १ हजार ३७३ विद्यार्थ्यांना पदवी आणि ९७० विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्रं देण्यात आली.