पुणे : ‘सायबर गुन्ह्यांत आतापर्यंत ७० हजार कोटींची फसवणूक झाली असून, सहकारी बँकांमधील ठेवीदारांच्या ठेवींच्या सुरक्षिततेसाठी संचालकांनी तातडीने सायबर सुरक्षा प्रणालीचा अवलंब करावा,’ असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.
रामराज्य सहकारी बँकेच्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचे अनावरण बिबवेवाडीतील सुप्रीम प्लाझा सोसायटीतील बँकेच्या प्रांगणात शनिवारी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार चेतन तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, रामराज्य बँकेचे संस्थापक विजय मोहिते, विधिज्ञ सुभाष मोहिते, अध्यक्ष नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्य, राष्ट्रीय, जिल्हा आणि तालुका पातळीवरील बँकिंग क्षेत्राला सायबर गुन्ह्यांमुळे ७० हजार कोटींचा फटका बसला आहे. सुरक्षिततेसाठी या बँकांनी सायबर सुरक्षात्मक प्रणाली विकसित केली आहे. त्याच धर्तीवर सहकारी बँकांसाठीही सायबर सुरक्षा प्रणाली तयार केली असून, अनेक सहकारी बँकांनी याचा अवलंब सुरू केला आहे. यातून ठेवीदारांच्या ठेवी, बँकांचे व्यवहार, गोपनीयता अबाधित राहील.’
‘सहकार क्षेत्र आणखी लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी मोठे बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य स्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून अभ्यास करून स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त होताच येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात त्याला मंजुरी देण्यात येईल,’ असे पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘सहकार क्षेत्राबद्दल लोकांमध्ये आपलेपणाची भावना रुजणे गरजेचे आहे. त्यामुळे संचालक मंडळाने राजकारण बाजूला ठेवून ठेवीदार आणि बँकेच्या हितार्थ काम करणे अपेक्षित आहे. काळानुरूप सहकार क्षेत्रातही नवीन बदल आवश्यक आहेत. ठेवीदारांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार, सुरक्षित ठेवी आणि कामकाजाच्या इतर बाबींनुसार धोरणात्मक बदल करण्यात येतील.’