बाजारात एखाद्या गोष्टीला कधी आणि केव्हा महत्त्व येईल याचा काही ठोकताळा नसतो. तांब्याच्या वस्तू बाजारात चांगल्या भाव खातील असे कोणी वीस वर्षांपूर्वी सांगितले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता; पण आता चित्र असे आहे की नव्या जमान्यात तांब्याला आणि तांब्याच्या वस्तूंना चांगली मागणी सुरू झाली. तांब्याच्या वस्तू घराची शोभा वाढवण्यासाठी वापरल्या जाऊ लागल्यामुळे कसबी कारागिरांसाठी व्यवसायाचे सध्याचे चित्र खूप आशादायी ठरले आहे.
पुण्यातील तांबट समाजाच्या व्यवसायाला तांबे, पितळेची भांडी घडवण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. कसबा पेठेतील तांबट आळी शिवकाळात वसवली गेल्याचा इतिहास आहे. तांब्याचे पत्रे आणून विविध वस्तू बनवणे हा या समजाचा पारंपरिक व्यवसाय. या वस्तूंमध्ये पाणी तापवण्यासाठीचे तांब्याचे बंब, अंघोळीसाठी घंगाळी, हंडे, पातेली, कळशा, पराती यांचा समावेश होतो. याच पारंपरिक व्यवसायाला तांबट समाजातील तरुण पिढीने आता आधुनिकतेची जोड देत व्यवसायाला नवे रूप दिले आहे. त्वष्टा कासार समाज संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र वडके या बदलाबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, आमचा समाज प्रथमपासूनच परिवर्तनशील राहिला आहे. व्यवसायात कालानुरूप केलेले बदल हे त्याचेच ठसठशीत उदाहरण आहे. बदलामुळे पारंपरिक शेकडो वर्षांची आमची कला तर टिकून राहिली आहेच, शिवाय या कलेला नवी परिमाणेही लाभत आहेत.
स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमने तांब्याच्या व्यवसायावर निश्चितपणे आक्रमण केले. मात्र तांब्याचे महत्त्व आयुर्वेदाने अधोरेखित केल्यानंतर तांब्याचा वापर पुन्हा वाढला. पूर्वी जी तांब्याची भांडी रोजच्या वापरात होती त्यांचा वापर आता केला जात नसला, तरी त्यांच्या प्रतिकृतींना मात्र मोठी मागणी येत आहे. तांब्याचा छोटा बंब, पातेली, घंगाळी या वस्तू आता घराची शोभा वाढवण्यासाठी आणि सौंदर्यासाठी वापरल्या जात आहेत. त्याबरोबरच मोठे बंगले, मोठी हॉटेल्स येथे देखील शोभेसाठी म्हणून तांब्याची भांडी ठेवण्याचा नवा प्रघात पडला आहे. हॉटेलमध्येही पदार्थ देण्यासाठी तांब्याच्या भांडय़ांचा वापर वाढला आहे. त्यामुळे तांब्याच्या हरतऱ्हेच्या भांडय़ांना आणि शोभीवंत वस्तूंना गेल्या काही वर्षांत वाढती मागणी असल्याची माहिती वडके यांनी दिली.
लक्ष्मण खरवलीकर हे गेली सत्तर वर्षे तांब्याच्या वस्तू घडवण्याचे काम करत आहेत. तांब्याच्या वस्तू घडवणे हे कसबी कलाकारांचेच काम आहे. वस्तू तयार झाल्यानंतर ती विशिष्ट पद्धतीने दोन पायात धरणे आणि ती योग्यप्रकारे सरकवत सरकवत वस्तूवर एकेक ठोका देण्याची म्हणजे मठारकाम करण्याची कला तांबट समाजाच्या अंगी वंशपरंपरागत आलेली आहे. हे काम सर्वात अवघड आणि एकाग्रतेचे. या कामामुळे त्यांब्याच्या वस्तूंची शोभा व शक्ती वाढते. तांब्याच्या वस्तूंमध्येही पुणे घाट, नाशिक घाट वगैरे प्रकार आहेत. पुणे घाटाची भांडी तयार करण्यात खरवलीकर हे निष्णात मानले जातात.
या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्याचे काम किशोर करडे, प्रवीण खरवलीकर यांच्यासारखे अनेकजण करत आहेत. नव्या जमान्यात तांब्याचे छोटे बंब, छोटी घंगाळी, लोटे, िपप, पाण्याचे जग, कलाकुसरीच्या तांब्याच्या डब्या, फुलदाणी, मेणबत्त्यांचे स्टँड यासारख्या शोभिवंत उत्पादनांना चांगली बाजारपेठ आहे. विशेष म्हणजे पुण्यात तयार होत असलेल्या या कलात्मक वस्तू परदेशी बाजारपेठांतही पोहोचल्या आहेत. त्या बरोबरच ऑनलाईन खरेदीमुळेही तांब्याच्या वस्तूंना चांगली मागणी येत असल्याचा करडे आणि खरवलीकर यांचा अनुभव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Copper items golden days
First published on: 14-02-2016 at 02:46 IST