करोना व्हायरसच्या संकटामुळे पुणे शहरातील व्यापाऱ्यांपाठोपाठ सलून मालकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुण्याच्या मार्केट यार्डातील ‘फळे-भाजीपाला व कांदा – बटाटा बाजारा’बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
“करोना व्हायरसच्या संकटामुळे शुक्रवार दिनांक 20 मार्च 2020 व शनिवार दिनांक 21 मार्च 2020 रोजी फळे-भाजीपाला व कांदा – बटाटा बाजार संपूर्णपणे बंद असेल. तसेच, 31 मार्च 2020 पर्यंत दर बुधवारी व दर शनिवारी संपूर्ण बाजार स्वच्छतेसाठी बंद केला जाईल”, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनकडून देण्यात आली आहे. आडते असोसिएशन व दोन्ही कामगार संघटना यांची आज, दिनांक 18 मार्च 2020 रोजी तातडीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
दरम्यान, यापूर्वी करोनामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून गुरुवापर्यंत (१९ मार्च) व्यापार बंद ठेवण्यात येणार असल्याने शहरातील व्यापारी पेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. करोनामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवार (१७ मार्च) ते गुरुवापर्यंत (१९ मार्च) व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे, औषधे, किराणामाल विक्रेते वगळून बहुतांश व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले. शहरातील रविवार पेठ, बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, शनिपार,अप्पा बळवंत चौक, फडके हौद चौक, भवानी पेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने नेहमी गजबजलेल्या या भागात शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरातील व्यापाऱ्यांनी बंद ठेवला असला तरी उपनगरात मात्र सर्वत्र व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते.