सहकारनगरमधील पं. भीमसेन जोशी कलादालनात भरविण्यात आलेले चित्रकला प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नसले, तरी महापालिकेच्या अरेरावीमुळे आणि आडमुठेपणामुळे चित्ररसिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी वीस रुपयांचा भुर्दंड दिला जात आहे. या भुर्दंडामुळे या प्रदर्शनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे आणि मराठवाडय़ातील बारा चित्रकारांना पुण्यातील हा वाईट अनुभव घेऊन गुरुवारी परतावे लागणार आहे.
मराठवाडय़ातील चित्रकारांची कला पुणेकरांसमोर यावी, या उद्देशाने चित्रकार विजय कुलकर्णी यांनी स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी कलादालन येथे हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या सर्वाना पुण्यात प्रदर्शन लावण्याची संधी या निमित्ताने प्रथमच मिळाली आहे. मुळातच, या प्रदर्शनासाठी बालगंधर्व कलादालन मिळावे यासाठी कुलकर्णी गेले सहा महिने पत्र देत होते. मात्र, प्रशासनाने त्यांना दाद लागू दिली नाही. अखेर हे प्रदर्शन रविवार (२१ एप्रिल) पासून सहकारनगर येथे आयोजित करण्यात आले.
प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ अशी आहे. मात्र, सकाळच्या सत्रात फारसे प्रेक्षक येत नाहीत. दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत तेथील बागूल उद्यानात लेसर शो आणि म्युझिकल फाऊंटन शो आयोजित केला जातो. त्याला वीस रुपये शुल्क आहे.  कलादालनही याच परिसरात असल्यामुळे येणारी प्रत्येक व्यक्ती लेसर शो बघालयला येते असा नियम लावून प्रत्येकाकडून वीस रुपये गोळा केले जातात. वास्तविक, ज्यांना फक्त चित्रप्रदर्शन पाहायला यायचे आहे त्यांना हा भुर्दंड कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला असला, तरी येणाऱ्या प्रत्येकाकडून आठमुठेपणाने वीस रुपये गोळा केले जात आहेत.
चित्रकारांनी तेथील सुरक्षा रक्षक तसेच कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती केली की, फक्त चित्रप्रदर्शन पाहायाला येणाऱ्यांकडून शुल्क आकारू नका. कारण प्रदर्शनासाठी वीस रुपये मोजून कोणी येणार नाही. मराठवाडय़ातील कलाकारांची ही मागणी अरेरावीने धुडकावण्यात आली आणि कोणत्याही परिस्थितीत वीस रुपयांचे तिकीट काढले तरच प्रदर्शनात प्रवेश दिला जाईल, असा नियम लावण्यात आला आहे.
या परिस्थितीमुळे गेले चार दिवस प्रदर्शनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आणि कलाकारांसाठी हा अनुभव अतिशय मनस्ताप देणारा ठरला आहे. या प्रदर्शनाचा गुरुवारी (२५ एप्रिल) शेवटचा दिवस असून किमान शेवटच्या दिवशी तरी प्रेक्षकांना लेसर शोचे तिकीट काढण्याची सक्ती करू नये, अशी मागणी चित्रकारांनी केली आहे. मात्र, ती मागणी देखील कोणी मान्य करायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे.
चित्रप्रदर्शनासाठी शुल्क नको- लाहोटी
पुण्यातील ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांनीही या चित्रप्रदर्शनाला तिकीट लावले जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांची विनंतीही मान्य झाली नाही. कलादालनात चित्रप्रदर्शन पाहायला येणाऱ्यांकडून शुल्क आकारले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.