पुण्यातील भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या गाडीला वाहतूक पोलिसांनी जॅमर लावून कारवाई केली. यावेळी बालवाडकर यांनी वाहतूक पोलिसांना दमदाटी केली. या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी बालवडकर विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जंगली महाराज मंदिरासमोर सोमवारी सायंकाळी साडेचार ते नऊच्या दरम्यान नगरसेवक बालवडकर यांनी त्यांची कार जंलगी महाराज रोडवर नो-पार्किंगमध्ये लावली होती. डामसे हे नो पार्किंग मधील वाहनावर कारवाई करत होते. डामसे यांनी चालक गणेश चौधरी याला नो-पार्किंगमधून गाडी काढण्यास सांगितले.
त्यावेळी त्याने पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. डामसे यांनी गाडीला जॅमर लावून पुढील चौकात कारवाईसाठी गेल्यावर बालवडकर यांनी फोनवरून डामसे यांच्याशी संवाद साधत. वेगळी भाषा वापरत सरकार कामात अडथळा आणला. तर त्यांच्या चालकाने वाहतूक पोलिसांना चुकीचे नाव सांगितले. या सर्व प्रकरणावरून नगरसेवक अमोल बालवडकर आणि त्यांच्या चालकावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आधिक तपास करण्यात येत आहे.