पिंपरी : मद्याच्या नशेत असलेल्या आरोपींनी दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पॅन्डल हिसकावून नेल्याची घटना पिंपरीत गांधीनगर येथे घडली. याप्रकरणी महिलेने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत मिठाई विकण्यासाठी जात होत्या. त्यावेळी संदेश आणि शुभम मद्याच्या नशेत आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. याचवेळी पवन याने महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पॅन्डल जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि तेथून पळून गेले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

बनावट स्वाक्षरु करून फसवणूक

भागीदाराच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रे बनवून पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील कुरुळी येथे उघडकीस आला आहे.

या प्रकरणात एका ६१ वर्षीय व्यक्तीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथील १०४.५ गुंठे जागेत फिर्यादी ५० टक्के नोंदणीकृत भागीदार आहेत. आरोपींनी संगनमत करून गुन्हेगारी कट रचला. त्यांनी फिर्यादीच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून, बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून ती जागा स्वतःची असल्याचे दाखवले. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

जुन्या वादातून चौघांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी सिमेंटचा गट्टू डोक्यात फेकून मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला. तसेच तरुणाच्या ऑटो रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना गेल्या सोमवारी रात्री खराळवाडी, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी प्रथमेश सतीश टंकसाळे (२३, खराळवाडी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या भावासोबत झालेल्या वादाच्या रागातून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. सिमेंटचा गट्टू हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात फेकून मारला, ज्यामुळे त्यांना हनुवटीवर आणि डोक्यात दुखापत झाली. या घटनेत आरोपींनी ऑटोरिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. संत तुकारामनगर पोलिस तपास करत आहेत.

देहूरोडमध्ये अपघातात तरुण जखमी

भरधाव वेगात असलेल्या मोटारीने एका दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. या धडकेत त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून, खांदा आणि मनगटाजवळ फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी देहुरोड येथे मुंबई-पुणे महामार्गावर घडली.

याप्रकरणी प्रजिष वासुदेवन नायर (३५, किवळे) यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजिषचा मोठा भाऊ प्रजित हा कामासाठी देहूरोडहून पिंपरीकडे दुचाकी वरून जात होता. देहूरोड येथे पाठीमागून आलेल्या मोटारीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत प्रजितच्या डोक्याला, चेहऱ्याच्या डाव्या बाजूला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. तसेच, त्याच्या डाव्या खांद्याजवळ, डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ आणि मनगटाजवळ फ्रॅक्चर झाले आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहे.