Couple In Pune Beaten While Watching The Conjuring Last Rites: ‘द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स’ हा भयपट नुकताच प्रदर्शित झाला असून, याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, पुण्यातील चिंचवड येथे स्थानिक मल्टिप्लेक्समध्ये शुक्रवारी रात्री ‘द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुण तंत्रज्ञ आणि त्याच्या पत्नीला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तंत्रज्ञ आणि त्याची पत्नी दोघेही जखमी झाले आहेत. याबाबत द टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

रविवारी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तंत्रज्ञाच्या मागे बसलेला एक व्यक्ती त्याच्या पत्नीला या हॉरर चित्रपटात पुढे काय होणार याबात सतत मोठ्याने सांगत होता. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला. यावेळी तंत्रज्ञासोबत, त्याची पत्नी आणि बहीण होत्या. त्याने नम्रपणे मागे बसलेल्या व्यक्तीला सस्पेन्स खराब करणे थांबवण्याची विनंती केली. सुरुवातीच्या विनंतीमुळे परिस्थिती शांत झाली, मात्र, मध्यांतरादरम्यान पुन्हा तणाव निर्माण झाला.

पिंपरीतील वल्लभनगर येथील रहिवासी असलेल्या आरोपीने मध्यंतरादरम्यान या तंत्रज्ञांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि अचानक त्याच्यावर हल्ला केल्याने प्रकरण आणखी चिघळले.

बिजलीनगर येथील २९ वर्षीय तंत्रज्ञ असलेल्या पीडित तरुणाने सांगितले की, आरोपीने त्याच्या शर्टच्या कॉलरला पकडून ओढत नेले आणि चेहऱ्यावर, पोटावर व हातावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

जेव्हा या तंत्रज्ञाची पत्नी त्याला वाचवण्यासाठी पुढे आली तेव्हा आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिला शिवीगाळ करत तिच्यावरही हल्ला केला. यानंतर दोन्ही पीडितांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

चिंचवड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस जे मोहिते यांनी रविवारी औपचारिक तक्रार दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी वल्लभनगरमधील दाम्पत्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७, कलम ११५ आणि कलम ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. असेही टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक मायकेल चावेस यांनी दिग्दर्शित केलेल्या व व्हेरा फार्मिगा आणि पॅट्रिक विल्सन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स’ या हॉरर चित्रपटाने रविवारपर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.