पुणे : वाहतुकीच्या नियमांबाबत शाळांमधून बालभारती पाठय़पुस्तकांच्या माध्यमातून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे. याबरोबरच जिल्ह्यातील विविध पाच विद्यापीठांत देखील वाहतूक नियमांबाबत अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी ३९ नवी अपघात प्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) शोधली असून या ठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ससाणे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘वाहतुकीच्या नियमांबाबत शाळांमधून बालभारती पाठय़पुस्तकांच्या माध्यमातून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे. याबरोबरच जिल्ह्यातील विविध पाच विद्यापीठांत देखील असाच अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातच वाहतुकीच्या नियमांबाबत विस्तारने माहिती मिळण्यास मदत होईल.’

    दरम्यान, नव्याने आलेल्या एकात्मिक रस्ते अपघात माहिती प्रणालीचे सादरीकरण राष्ट्रीय सूचना केंद्राच्या धनंजय देशपांडे यांनी केले. राज्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रणालीचा सर्वात चांगला उपयोग करून ३९ नवी अपघात प्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) शोधली आहेत. रस्त्यावरील अपघात कमी करण्याबाबत विविध अशासकीय संस्थांकडून बैठकीत सादरीकरण करण्यात आले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे आदी उपस्थित होते. ब्लुमबर्ग फिलांथ्रोपिस इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी संस्थेच्या स्वाती शिंदे, सेंन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टच्या वतीने प्रशांत काकडे यांनी सादरीकरणाद्वारे जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या हस्ते जनजागृती उपक्रमात चांगले योगदान देणाऱ्या संस्था आणि प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. 

रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघात प्रवण स्थळे (ब्लॅक स्पॉट) कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने कार्यवाही करावी. अपघाताच्यावेळी मदतीसाठी त्वरीत धावून जाणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी