उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला भेट दिली. याठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधा व साधनसामग्रीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी उपस्थित वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयावार भाष्य केले.

यावेळी अनेक जिल्ह्यात करोना रूग्ण आढळत असल्याने सध्या दिलासा नसल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच सकाळी ७ ते सायंकाळी ४ दुकाने सुरू राहणार आहेत. राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारले आहेच. त्यामुळे करोनाची तिसरी लाट आली तर आपण सज्ज असल्याचे अजित पवार म्हणाले. पुण्यात यापुर्वी होते तेचं निर्बंध कायम राहणार आहेत. शनिवार, रविवार बंद राहणार आहेत्यामुळे पुणेकरांना दिलासा नाही.

करोनाचे प्रमाण कमी होऊ द्या, आपण निर्बंध शिथिल करू

“मॉलमध्ये एखादा माणूस काही खरेदी करायला गेला तर तो सर्वत्र फिरत बसतो. म्हणून मॉल सुरू करण्यास परवानगी नाही. लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मॉलमध्ये प्रवेश देता येईल का, याचा विचार सुरू आहे. तसेच करोनाचे प्रमाण कमी होऊ द्या, आपण निर्बंध शिथिल करू”, असे अजित पवार म्हणाले.

पुण्यातील पाणी साठ्यावर अजित पवार म्हणाले, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये  सध्या ३०-३१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पुण्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागेल.

हेही वाचा- Corona Vaccine: मोदी सरकारने दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; तब्बल ६६ कोटी डोस होणार उपलब्ध

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक पुजा करणार

सलग दुसऱ्या वर्षीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या महापूजेची संधी लाभली आहे. येत्या २० तारखेला आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला जाणार आहेत. यावेळी त्यांना वारकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मात्र वारकऱ्यांनी राज्य सरकारची भूमिका समजून घेतल्यामुळे त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले.

बकरी ईद साठी गेल्यावर्षीसारखं धोरण

२१ तारखेला बकरी ईद आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी गेल्यावर्षीसारखंच धोरण असेल असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.