पुणे : राज्य शासनाकडून कोव्हिशील्ड लशीचा अत्यल्प पुरवठा झाल्याने महापालिकेच्या पाच रुग्णालये आणि प्रसृतीगृहांमध्येच कोव्हिशील्डची वर्धक मात्रा देण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांना १५ जुलैपासून विनामूल्य वर्धक मात्रा देण्यास सुरूवात करण्यात आली.  त्यासाठी पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये ६८ केंद्र निश्चित करण्यात आली होती. या केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड करोना प्रतिबंधक दोन्ही लशींची मात्रा देण्यास सुरुवात झाली. मात्र कोव्हिशील्ड लशीचा पुरवठा अत्यल्य होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, कसबा-विश्रामाबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कमला नेहरू रुग्णालय, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी रुग्णालय, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कै. जयाबाई सुतार दवाखाना, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कै. अण्णाभाऊ मगर रुग्णालय येथेच कोव्हिशील्डची वर्धक मात्रा दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिन लशीची वर्धक मात्रा यापूर्वी निश्चित केलेल्या केंद्रात दिली जाणार आहे.

शहरात १२ ते १४ वयोगटातील मुलांना काॅर्बेव्हॅक्स लस तर १८ वर्षापुढील सर्व नागरीकांना पंधरा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या महापालिकेच्या ६८ दवाखान्यात लस दिली जाणार आहे, अशी माहिती लसीकरण प्रमुख डाॅ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झालेल्या तसेच मागील तीन महिन्यात करोनाचा संसर्ग न झालेल्या व्यक्ती वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत. घराच्या जवळील महापालिकेचा दवाखाना अथवा रुग्णालयात जाऊन लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covishield vardhak facility five hospitals insufficient stock pune print news ysh
First published on: 26-07-2022 at 19:44 IST