करोना काळानंतर बांधकाम व्यवसाय क्षेत्र सावरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात करावी. पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी असलेले बाजार मूल्यदर (रेडिरेकनर) हे देखील अभ्यास करून तर्कसंगत करावे, अशी विनंती क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने करण्यात आली. याबाबत क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे. हेही वाचा >>>पुणे: विद्यापीठांतील पदवी प्रदान समारंभ आता बंद; चंद्रकांत पाटील यांची माहिती मुद्रांक शुल्कात कपातीचा निर्णय ग्राहक आणि बांधकाम व्यवसायाच्या फायद्याचा आहे. तसेच घर खरेदीदारांची संख्या वाढून त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला देखील होणार आहे, असे फरांदे यांनी सांगितले. तर, मुद्रांक शुल्क कपात केल्यावर ग्राहकांचे बँकेचे हप्ते आणि कर्जाचा कालावधी देखील कमी होणार आहे. करोना काळात तत्कालीन सरकारने मुद्रांक शुल्क कमी केले असताना जमा झालेला महसूल पुरेसा बोलका आहे. सध्याचे सात टक्के इतके मुद्रांक शुल्क हे खूप जास्त असून मध्यमवर्गीयांना परवडणारे नाही, याकडे क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांनी लक्ष वेधले.