पिंपरी : ‘स्टोरी आधी सांगू नका’ आणि शांत बसण्याची विनंती केल्यामुळे चित्रपटगृहात एका तरुणाला मारहाण केल्याची घटना चिंचवड येथील एका थिएटरमध्ये घडली. या प्रकरणात २९ वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहत असताना, त्याच्या मागील आसनावर बसलेल्या आरोपीला त्याने ‘स्टोरी आधी सांगू नका’ आणि ‘शांत बसा’ अशी विनंती केली. यामुळे चिडून आरोपीने फिर्यादीची कॉलर पकडून त्याला मारहाण केली आणि खाली पाडले. आरोपीने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले, ज्यामुळे त्याच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला दुखापत झाली. फिर्यादीची पत्नी भांडण सोडवण्यासाठी पुढे आली, तेव्हा आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

चऱ्होलीत महिलेच्या खात्यातील पाच लाख रुपयांचा गैरवापर

एका महिलेच्या बँक खात्यातील पाच लाख रुपये तिच्याच मैत्रिणीने वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चऱ्होली येथे घडली.

या प्रकरणात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील रहिवासी असलेल्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने व्यवसायाबाबत चर्चा करण्यासाठी आरोपी महिलेला तिचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड दिले होते. आरोपीने त्या माहितीचा उपयोग करून कोणताही करार केला नाही आणि करार करण्यास टाळाटाळ केली. तसेच आरोपीने पीडित महिलेकडून व्यवसायासाठी ७ आणि ८ जानेवारी रोजी घेतलेले पाच लाख रुपये तिच्या वैयक्तिक कामासाठी वापरले. दिघी पोलीस तपास करत आहेत.

जुन्या भांडणातून तरुणांवर दगडफेक

जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना बावधन येथे घडली.

याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मित्रांसोबत घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली. एकजण भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपीने रस्त्यावरील दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला. उजव्या हातावर दगड मारून जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.

टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन महिलांचा मृत्यू

टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका १७ वर्षीय तरुणी आणि एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री भोसरीतून सदगुरुनगर कमानकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

कादंबरी काशिनाथ गादेकर (१७) आणि प्रतिभा कृष्णा आंबटवार (३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी काशिनाथ पांडुरंग गादेकर (४१, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत सोपान वाडेकर (३६, शिरोली, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंतने त्याच्या ताब्यातील टेम्पो वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवत होता. त्याने फिर्यादीची मुलगी कादंबरी आणि मेव्हण्याची पत्नी प्रतिभा आंबटवार यांना जोरात धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळी न थांबता पळून जात असताना लोकांनी त्याला पकडले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक

मोटार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत दुचाकीला धडक दिल्याची घटना काळेवाडी फाटा ते रहाटणी फाटा या दरम्यान बीआरटीमध्ये घडली.

याप्रकरणी ३६ वर्षीय तरुणाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोटार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पत्नीसह दुचाकीवरून जात असताना, एका मोटार चालकाने दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे फिर्यादी यांच्या डोळ्याखालील बाजूला, उजव्या हाताला आणि त्यांच्या पत्नीच्या उजव्या पायाला व उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. तसेच, दुचाकीचे आणि मोबाईल व हातातील घड्याळाचे नुकसान झाले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

गोवंश तस्करी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी दोन जर्सी गायींची दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई किवळेत करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश कदम यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत पोलिसांना पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली की, एका वाहनातून गायींची वाहतूक केली जात असून त्यांना कत्तलखान्यात नेले जात आहे. त्यानुसार रावेत पोलिसांनी कारवाई करत एक टेम्पो पकडला. त्यातून ३० हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गायींची सुटका केली. रावेत पोलीस तपास करत आहेत.