पुणे : शहरात शिक्षणासाठी आलेल्या बुलढाण्यातील युवकाने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने दुचाकी, तसेच मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी एका महाविद्यालयीन युवकास मुंढवा पोलिसांनी अटक केली असून, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी आणि दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.
सूरज संजय सोनाेने (वय २०, सध्या रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. गायगाव, ता. शेवगाव, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सोनाेने आणि साथीदारांनी मुंढवा परिसरात दुचाकी चोरी आणि मोबाइल चोरीचे गुन्हे केले होते. सोनोने आणि त्याचा मित्र दुचाकीवरून निघाले होते. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने संशयावरून दोघांना अडवले. त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. त्यानंतर चौकशीत दुचाकी चोरीची असल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा – अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मला जर कुणी…”
सोनोने आणि अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्यांनी दुचाकी चोरी आणि मोबाईल संच हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यांनी मोटारीची काच फोडून मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी आणि दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे आणि पथकाने ही कारवाई केली.