पिंपरी : अल्पवयीन मुलावर कोणतीही कारवाई होणार नाही, कारवाई झाली असता त्याला अल्पवयीन असल्याने तात्काळ सोडून दिले जाईल, असे सांगून अल्पवयीन मुलाकडून सोनसाखळी चोरी सारखे गुन्हे करून घेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. हा गुन्हेगार चोरीचे दागिने एका सराफाला विकत होता. चोरीचे दागिने असल्याचे माहिती असताना त्याच्याकडून दागिने खरेदी करणाऱ्या सराफाला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

करण सुनील गोयल (वय ३७, कोंढवा, पुणे) असे सराइत गुन्हेगाराचे नाव आहे. मुरलीधर उदयलाल सोनी (४०, कोंढवा, पुणे) असे सराफाचे नाव आहे. या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस उप आयुक्त डॉ शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात एक चोरटा रात्री दहा ते मध्यरात्री एक या कालावधीत दुचाकीवरून भरधाव वेगात येऊन नागरिकांच्या गळ्यातील दागिने चोरी करत असल्याने गुन्हे शाखा युनिट एक आणि मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सांगवी परिसरात सापळा लावला.

एक मुलगा दुचाकीवरून वेगात येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने वेगाने दुचाकी चालवली. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला करण गोयल हा व्यक्ती चोरी करण्यास प्रवृत्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्पवयीन असल्याने तुझ्यावर पोलीस कोणतीही कठोर कारवाई करणार नाहीत. तसेच लगेच सोडून देतील, असे सांगून करण गोयल हा अल्पवयीन मुलांकडून सोनसाखळी चोरीचे गुन्हे करून घेत होता. चोरी केलेले दागिने करण हा सराफ व्यावसायिक मुरलीधर सोनी याला विकत होता. मुरलीधर सोनी याला चोरीचे दागिने असल्याचे माहिती असतानाही तो अर्ध्या किमतीत हे दागिने खरेदी करत असे. पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला देखील अटक केली आहे. या कारवाईमुळे सांगवी, वाकड, हिंजवडी, निगडी, बाणेर, चतुःश्रृंगी, हडपसर, मुंढवा, शिवाजीनगर, डेक्कन पोलीस ठाण्यातील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, रावसाहेब मोटे, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद स्वामी, संतोष इंगळे, दिलीप चौधरी, महादेव जावळे, शिवराम भोपे, देवा राऊत, जयवंत राऊत, विजय शेळकंदे, दीपक तांदळे, संदेश देशमुख, विजय जानराव, उद्धव खेडकर, लक्ष्मीकांत पतंगे, तेजस भालचिम, सोमनाथ मोरे, पवन वाजे, सुमित देवकर, मोहसीन अत्तार, चंद्रकांत गडदे यांनी केली.

फोन न उचलल्याने पत्नीला शूजने मारहाण

पतीने फोन केल्यानंतर पत्नीने फोन उचलला नाही. या कारणावरून पतीने पत्नीला सेफ्टी शूजने मारहाण केली.   ही घटना  तळेगाव दाभाडे परिसरात घडली.

याप्रकरणी पत्नीने  तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. पतीने पत्नीला फोन केला. मात्र पत्नीने फोन उचलला नाही. या कारणावरून त्याने पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सेफ्टी शूजने त्यांच्या पोटावर मारले. तसेच गळ्यावर पाय ठेवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.