ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या रकमेचे पीकनिहाय विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे मदतीच्या निधीला कात्री लागण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या ३९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने एकूण १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे.
जिल्ह्य़ात जे नुकसान झाले त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. जिल्ह्य़ात भात, सोयाबीन, ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक २७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात कमी नुकसान भोर तालुक्यात साडेपाचशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले आहे.
जिल्ह्य़ात अवकाळीने झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले आहेत. जिल्ह्य़ात एक लाख १५ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू, बागायती आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीचा फटका जिल्ह्य़ातील एक लाख २० हजार शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचे पीकनिहाय विभाजन करण्यात आले आहे. खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार रुपये, तर फळबागा आणि बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. कमाल दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत ही मदत दिली जाईल. मदतीसाठी १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, मदतीच्या रकमेचे विभाजन करण्यात आल्याने निधीला कात्री लागण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान, फळबागा आणि बागायती वगळता अन्य खरिपाच्या पिकांसाठी वेगवेगळ्या रकमेची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावित १३८ कोटी निधीला कात्री लागण्याची शक्यता आहे.
केंद्रीय पथकाची पुण्याकडे पाठ
शेतकऱ्यांना जी मदत द्यायची आहे त्याचा सात हजार २०७ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला आहे. त्याची दखल घेऊन केंद्राने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) पथक राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला. या पथकाने पहिल्या टप्प्यात नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद येथे पाहणी केली असून अद्याप पुणे जिल्ह्य़ात हे पथक पाहणीसाठी आलेले नाही. दरम्यान, मदतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित निधीचे वाटप जिल्ह्य़ात केले जाणार आहे.