पुढच्या सुनावणीच्या वेळी डीएसकेंनी ५० कोटी घेऊन हजर राहावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत. ज्यानंतर लगेचच १३ फेब्रुवारीला कोर्टासमोर हजर राहणार असल्याचे डी. एस. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. हायकोर्टाने मला हजर राहण्यास सांगितले आहे त्यामुळे मला माझी बाजू मांडण्याची संधी मिळू शकणार आहे.
मी तपास यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. यापुढेही सहकार्य करत राहिन. माझ्या गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी मी माझ्या मालमत्ताही विकायला तयार आहे. मात्र काही लोक या प्रक्रियेत जाणीवपूर्वक आडकाठी करू पाहात आहेत, कायदेशीर अडचणी निर्माण करत आहेत. लोकांमध्ये अफवा पसरवत आहेत ज्यामुळे मालमत्ता घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही असेही डीएसकेंनी म्हटले आहे.
रक्कम जमा करण्यासाठी मी आता क्राऊड फंडिंगचा वापर करणार असल्याचे डीएसकेंनी म्हटले आहे. माझे मित्र जगभरात आहेत आणि ते मला माझ्या अडचणीच्या काळात मदत करतील याची मला खात्री आहे असेही डीएसकेंनी म्हटले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. इतरांनी मला मदत करावी असेही आवाहन डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे. मी कुठेही पळून जाणार नाही सगळ्यांचे पैसे परत करणार आहे असेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.
सलग तिसऱ्या वेळी डी. एस. कुलकर्णी गुंतवणूकदारांचे ५० कोटी कोर्टात भरण्यात अपयशी ठरले आहेत. यावरून हायकोर्टाने आज डीएसकेंना चांगलेच फटकारले. मालमत्ता विकून पैसे उभे करता येत नसतील तर डीएसकेंनी प्रसंगी भीक मागावी पण गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत अशा शब्दांमध्ये सुनावल्यानंतर डीएसकेंनी क्राऊड फंडिंगचा पर्याय कोर्टासमोर ठेवला आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे फेडण्यासाठी मी मालमत्ता विकायला गेलो तर मला मालमत्ता विकू दिली जात नाही. डीएसकेंची मालमत्ता विकत घेतली तर ती जप्त होईल, असा प्रचार केला जात आहे. याद्वारे काहींचा आम्हाला उध्वस्त करण्याचा डाव आहे. यामागे काही राजकीय गटांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. असे असूनही कोर्टाने प्रसंगी भीक मागा पण पैसे उभे करा असे म्हटले आहे ज्यानंतर क्राऊड फंडिंगचा पर्याय त्यांनी कोर्टासमोर ठेवला आहे.