स्मशानभूमीपर्यंत दुचाकी फेरी; दोनशे जणांविरोधात गुन्हा

पुणे : शहरात कठोर निर्बंध लागू असताना बिबवेवाडीत झालेल्या सराईत गुंडाच्या खुनानंतर त्याच्या समर्थकांनी कात्रज स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गर्दी केली तसेच दुचाकींची फेरी काढून दहशत निर्माण केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांकडून दीडशे ते दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ॠषिकेश भगत, गणेश फाळके यांच्यासह दीडशे ते दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र केंजळे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिबवेवाडीत समाजमाध्यमावर ‘स्टेटस’ ठेवण्याच्या वादातून गुंड माधव वाघाटे याचा शुक्रवारी मध्यरात्री खून करण्यात आला. शनिवारी दुपारी त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कठोर निर्बंध लागू असताना गुंडाच्या साथीदारांनी धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत दुचाकी फेरी काढली.

संचारबंदीच्या आदेशाचा भंग तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बी. एस. खेंगरे तपास करत आहेत.

अंत्यविधीसाठी गर्दी करणाऱ्यांचा शोध सुरू

शहरात करोना संसर्ग असताना आदेशाचे उल्लंघन करून गुंडाच्या अंत्यविधीसाठी गर्दी तसेच दुचाकी फेरी काढणाऱ्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सातारा रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे केलेले चित्रीकरण पडताळण्यात येत आहे. त्याआधारे साथीदारांचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. खेंगरे यांनी सांगितले.

शहरात गुंडांची दहशत; पंधरा दिवसांत सहा खून

नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कोथरूडमधील गुंड गजानन उर्फ गजा मारणे आणि साथीदारांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून महागडय़ा मोटारीतून मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी मारणे टोळीवर कारवाई केली. द्रुतगती मार्गावर मिरवणूक काढून दहशत केल्याप्रकरणी कोथरूड, वारजे, तळेगाव, खालापूर पोलीस ठाण्यात मारणे टोळीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शहरात कठोर निर्बंध लागू असताना बिबवेवाडीत माधव वाघाटे याचा खून झाला. गेल्या पंधरा दिवसांत शहरात सहा खून झाले आहेत.