पुनर्वसन करण्याच्या नावाखाली सायकल मार्गावरची जागा फेरीवाल्यांना देत महापालिका अतिक्रमण करीत असल्याच्या निषेधार्थ पुणे सायकल प्रतिष्ठानतर्फे रविवारी (२० जुलै) सायकल फेरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका हद्दीमध्ये साधारणपणे १४० किलोमीटरचे सायकल मार्ग बनविण्यात आले आहेत. त्यासाठी साधारणपणे ४० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, या मार्गावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्यामुळे त्याचा फारसा वापर होत नाही. त्याचबरोबर सायकल मार्गावर वाहनांचे पार्किंग केल्यामुळे सायकलस्वारांना मुख्य रस्त्यावरूनच सायकल चालवावी लागते, याकडे लक्ष वेधून सारडा म्हणाले, कमी जागा लागण्याबरोबरच हवा आणि ध्वनिप्रदूषण न करणाऱ्या पादचारी आणि सायकलस्वारांना रस्त्यावर प्राधान्य मिळाले पाहिजे. ते करण्याचे सोडून महापालिका ही जागा रितसर फेरीवाल्यांना देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कदापि मान्य होणारे नाही. त्याच्या निषेधार्थ रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथून सकाळी आठ वाजता सायकल फेरी काढण्यात येणार आहे. नवीन सायकल मार्ग बनविताना पुणे सायकल प्रतिष्ठानच्या सभासदांना सहभागी करून घ्यावे, अशी प्रमुख मागणी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2014 रोजी प्रकाशित
पुणे सायकल प्रतिष्ठानतर्फे रविवारी सायकल फेरी
सायकल मार्गावरची जागा फेरीवाल्यांना देत महापालिका अतिक्रमण करीत असल्याच्या निषेधार्थ पुणे सायकल प्रतिष्ठानतर्फे रविवारी (२० जुलै) सायकल फेरी काढण्यात येणार आहे.

First published on: 19-07-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cycle round by pune cycle pratishthan on sunday