नागरिकांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या दरोडेखोरावर दौंड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तो रुग्णालयातून पसार झाला. याप्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
नेमसिंग उर्फ नयनसिंग उर्फ बाळू ठाकूर (वय २२, रा. फुलमळा, भोपाळ, मध्यप्रदेश) असे पळून गेलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील शिवराजनगर येथे पंधरा दिवसांपूर्वी एका घरात पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडा टाकून पळून जात असताना घरमालकाने त्याच्याजवळीस परवानाधारक छऱ्याच्या रायफलीतून गोळीबार केला होता. यामध्ये दरोडेखोर ठाकूर हा जखमी झाला होता. इतर दरोडेखोर उसाच्या शेतात शिरल्यानंतर संपूर्ण ऊस तोडण्यात आला होता. त्यावेळी राजीव पवार या दुसऱ्या दरोडेखोराला अटक केली होती. ठाकूर हा जखमी असल्यामुळे त्याच्यावर दौंड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक पोलीस ठेवण्यात आला होता. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ठाकूर याने शौचालयास जायचे असल्याचे सांगून पायातील बेडय़ा काढायला लावल्या. शौचालयास आतमध्ये गेल्यानंतर खिडकीचा गज वाकवून तो पळून गेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक येवला हे अधिक तपास करत आहेत.