पुणे : गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात केरळमधील तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. केरळ आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचा मिलाफ असलेले हे मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल.
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथे यंदाची सजावट साकारणारे कलादिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते शनिवारी सजावटीचा श्रीगणेशा झाला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी ही माहिती दिली. उपाध्यक्ष बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आमदार हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.
रासने म्हणाले, ‘पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत पाच थरांचा गोपूर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तर्षी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभाऱ्यात विष्णू-लक्ष्मी, शिव-पार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असतील. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. पद्मनाभ स्वामींचे दर्शन तीन दरवाजांमधून घेता येते. पहिल्या दरवाजातून पद्मनाभ आणि त्याच्या हाताखाली शिवलिंगाचे रूप दिसते. दुसऱ्या दरवाजातून पद्मनाभ, श्री देवी आणि भूदेवी यांच्या सोन्याच्या अभिषेक मूर्ती आणि पद्मनाभ स्वामींची चांदीची उत्सवमूर्ती पाहायला मिळेल. तर, तिसऱ्या दरवाजातून देवतेचे चरण आणि भूदेवी व मार्कंडेय मुनी यांचे दर्शन होते. अशा केरळमधील विलोभनीय पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे.
अशी असेल प्रतिकृती
‘पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. त्यामध्ये ३० भव्य खांब असून, ५०० देवी-देवता, ऋषी-मुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला आणि संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून, भाविकांना लांबूनही सहजतेने गणरायाचे दर्शन घेता येईल,’ अशी माहिती सुनील रासने यांनी दिली.