वीजमीटरचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी ‘महावितरण’ने नेमलेल्या ‘दामिनी’ या महिलांच्या पथकाने पुणे विभागात तब्बल ६३ लाख रुपयांच्या वीज युनिटची तफावत शोधून काढली आहे. त्यातील नऊ लाख ७० हजार रुपयांची वसुली करण्यात आली. त्याचप्रमाणे वीजचोरीबाबत सुरू असलेल्या मोहिमेमध्ये पुणे विभागात मागील महिन्यात ३९ लाख ४७ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्यात १४ जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
वीजमीटरचे रिडिंग अचूकपणे होते की नाही, यासाठी दामिनी पथकाकडून काम करण्यात येते. पुणे विभागातील सर्व मंडलांमध्ये हे पथक कार्यरत करण्यात आले आहे. गणेशखिंड मंडलाच्या दामिनी पथकाने गेल्या महिन्याभरात ८८ वीजग्राहकांकडील सदोष मीटर रीडिंग शोधले. त्यात ५१ लाख ४१ हजार रुपयांच्या पाच लाख ९१ हजार ६६९ युनिटची तफावत आढळून आली. पुणे ग्रामीण मंडलात ३० ग्राहकांकडे सहा लाख ८८ हजार ६०२ रुपयांच्या ६६ हजार ६९ युनिटची तफावत आढळून आली. रास्तापेठ मंडलामध्ये २३३ वीजग्राहकांकडे ४ लाख ७७ हजार रुपयांच्या वीजवापराची तफावत आढळली.
दरम्यान, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच वीजचोरांविरुद्धच्या कारवाईची मोहीम सध्या तीव्र करण्यात आली आहे. त्यात महिन्याभरात पुणे विभागात ३९ लाख ४७ हजार रुपयांच्या १७९ वीजचोऱ्या उघडकीस आल्या. त्यातील १० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ८१ लाख ६१ हजार रुपयांच्या अनधिकृत वीज वापराप्रकरणी ३२७ ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वीजचोरीत पकडलेल्यांपैकी ११८ जणांनी २३ लाख ८७ हजार रुपयांचे वीजबिल व दंडाच्या रकमेचा भरणा केला असून, उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विजेच्या अनधिकृत वापरात ८१ लाख ६१ हजार रुपयांची प्रकरणे उघडकीस आली. त्यातील ३५ जणांनी पाच लाख ६२ हजार रुपयांचा भरणा केला.