पुण्यातील खडकमाळ येथील एका इमारतीमध्ये चोरी करणार्‍या आरोपीचा पाठलाग करणार्‍या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्या आरोपीला पकडण्यात यश देखील आले आहे. मात्र भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विठ्ठल वामन बोळे असे आरोपीचे नाव आहे. तर आवेज सलीम अन्सारी (वय-23) असे जखमी तरुणीचे नाव आहे.

खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकमाळ येथील हीना टॉवर सोसायटीमध्ये आवेज सलीम अन्सारी हा तरूण राहतो. घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर, आवेजने आतमध्ये जाऊन पाहिले असता, त्याला एक अनोळखी व्यक्ती दिसला. तू कोण आहेस असे त्याला म्हणाताच, आरोपी आणि फिर्यादीमध्ये झटापट झाली. आरोपीच्या जवळ पिस्तूल होती त्यातून त्याने फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली. आवेजने ती चुकवली व  आरोपीला पकडून ठेवले. त्यावर आरोपीने चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही आवेजने आरोपीला पकडून इमारतीच्या खाली ओढत आणले. त्याच दरम्यान पुन्हा एकदा आरोपीने  आवेजच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी फिर्यादीने चुकवली आणि ती लोखंडी गेटवर लागली. हा सर्व प्रकार इमारतीच्या परिसरातील नागरिकांनी पाहताच त्यांनी आरोपीला पकडले. याबाबत आम्हाला माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फिर्यादी आवेज झटापटीत जखमी झाला आहे. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्याची तब्येत उत्तम आहे.

ज्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नाही तिथे तो चोरी करायचा : श्रीहरी बहिरट

आरोपी विठ्ठल वामन बोळे हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. त्याच्यावर तिथे देखील घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत. तसेच महिनाभरापूर्वी हडपसरमध्ये घरफोडी केल्याची देखील कबुली त्याने दिली आहे. ज्या सोसायटी परिसरात सीसीटीव्ही नाही. तिथे तो चोरी करायचा, अशी कबुली आरोपीने दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली आहे. तसेच, आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून नाशिक येथे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. करोना काळात तो जामीनावर बाहेर आला होता. बाहेर येताच त्याने अशा प्रकारचे गुन्हे करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. आता आम्ही तेथील पोलिसांकडून देखील अधिक माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.