बारामती : वाहनचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना टायरमध्ये घालून मारा. संबंधित वाहनचालक कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा मुलगा किंवा नातेवाईक असला, तरी त्याला सोडू नका.’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या. मोकाट जनावरे आणि गाढवे फिरताना आढळल्यास मालकांवर गुन्हे दाखल करा, असा आदेशही पवार यांनी प्रशासनाला दिला.
बारामती येथे वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच जनावरे आणि गाढवे मोकाट फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीत सावित्री हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला या सूचना केल्या.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘मोटरसायकलवरील काही तरुण नियमाचे उल्लंघन करताना दिसतात. असे तरुण किंवा व्यक्ती मोठ्या व्यक्तीच्या कुटुंबातील असली, तरी त्याला सोडू नका. त्यांना टायरमध्ये घालून झोडा. संबंधितांना दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत. नियम कोणीही तोडू नका. मी किंवा माझ्या नातेवाईकांना नियम सारखाच आहे.’
‘बारामतीत मोकाट जनावरे आणि गाढवे फिरताना आढळतात. यापुढे मोकाट जनावरे आणि गाढवे आढळल्यास मालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील.’ असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
‘हे वागणं बरं नव्हं’
‘आईसारखे कुणीही नसते. मी बारामतीत येतो तेव्हा आईला भेटतो. आईशी अतिशय आपलेपणाने वागा. शेवटपर्यंत आई-वडिलांना विसरू नका. अलिकडे नवी पिढी आई-वडिलांकडे बघत नाही, ‘हे वागणं बरं नव्हं’.’ अशी टीपण्णी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.