पुणे : सरकारी कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रण न देणे, कार्यक्रमपत्रिकेत त्यांंचे नाव न छापणे यावरून शनिवारी पुन्हा एकदा नाराजीनाट्य घडले. इंदापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) पाळला गेला नसल्याची नाराजी व्यक्त करून खासदार सुळे यांनी व्यासपीठाऐवजी प्रेक्षकांत बसणे पसंत केले. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व्यासपीठावर होते. खासदार सुळे यांनी या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

खासदार सुळे या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. मात्र, त्यांना इंदापूरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. कार्यक्रमपत्रिकेतही त्यांचे नाव नव्हते. खासदार सुळे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र, त्यांनी प्रेक्षकांंमध्ये बसणे पसंत केले. त्यांचा सत्कारदेखील प्रेक्षकांमध्येच करण्यात आला. ‘विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची नावे जाणीवपूर्वक कार्यक्रमपत्रिकेत दिली जात नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यापूर्वी तक्रार केली आहे,’ असे सुळे यांनी सांगितले.

बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील महावितरण उपकेंद्राच्या उद्घाटन समारंभावरून दोन आठवड्यांपूर्वी नाराजीनाट्य घडले होते. त्या कार्यक्रमाला बारामतीच्या खासदार सुळे यांना ऐन वेळी निमंत्रण दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादा-ताईंमध्ये अबोला! कार्यक्रम सुरू होण्याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संवाद साधला, तर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात संवाद झाला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी बोलणे टाळले.