पुणे : हिंजवडी आयटी क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्था विनाअडथळा आणि जलद गतीने कशी करता येईल, त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. यासाठी काही नवीन रस्ते प्रस्तावित तसेच रुंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रशासकीय यंत्रणांना दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी सकाळी सहा वाजताच हिंजवडी आयटी पार्कची पाहणी सुरू केली. यामुळे शासकीय यंत्रांची धावपळ उडाली.
आयटी पार्कची पाहणी केल्यानंतर त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात त्यांनी शासकीय यंत्रणांची आढावा बैठक घेतली. नैसर्गिक ओढे – नाल्याभोवती अतिक्रमण तसेच प्रवाह अडवल्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह इतर भागात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणी येत आहे. त्यामुळे अशा अतिक्रमणावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. या भागातील उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी रस्ते रुंद करत विनाअडथळा वाहतूक सुरळीत होईल, अशा उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले. हिंजवडी, माण, मारुंजीसह शहर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी नवीन रस्त्यांची आखणी तसेच रस्ते मोठे करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हिंजवडीसह परिसरातील रस्ते खराब झाले असून त्याची तातडीने दुरुस्ती करत नाल्यातील अनधिकृत बांधकामे पाडावीत, नाल्यांचा प्रवाह कोणी बदलला, याची चौकशी करत अशा बांधकामांवर कठोर कारवाईचे निर्देश, यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले. यासह पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खुला करत, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आराखड्यातील रस्ते तसेच नवीन रस्त्याची आखणी करत यासंबंधी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. बैठकीत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी हिंजवडी भागात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच रिंग रोडच्या कामाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
या बैठकीला आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, एमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे मेट्रो लाईन ३ चे काम गतीने पूर्ण करावे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बैठकीपूर्वी हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पुणे मेट्रो लाईन ३ स्थानक, हिंजवडी आदी भागातील मेट्रोच्या कामाची पाहणी करून मेट्रो लाईनचे काम गतीने पूर्ण करावे अशा सूचना मेट्रो व टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. हिंजवडी, माण, मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे – नाल्यांवरील अतिक्रमण तसेच पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमणावर कठोर कारवाई करून प्रवाह मोकळे करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना यावेळी दिले.