पिंपरी : आळंदीत मद्यविक्री, वेश्याव्यवसाय यांसारखे प्रकार वाढल्याच्या तक्रारी येत असून, आळंदीत घडणारे हे प्रकार चिंताजनक आहेत. पोलिसांना आवश्यक ती सर्व मदत देण्यात येत असताना असे प्रकार रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे प्रकार बंद न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिला.

आळंदीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार दिलीप मोहिते, तहसीलदार ज्योती देवरे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> Hinjewadi IT Park : मायक्रोसॉफ्टची हिंजवडीत मोठी गुंतवणूक! मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार

मंदिर परिसरात मद्यविक्री, वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांनी पवार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले की, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांसमोर नतमस्तक झाल्याशिवाय आपण पुढे जात नाही. पण, माउलींच्या आळंदीत घडणारे प्रकार चिंताजनक आहेत. पोलिसांना हवे ते दिले जात आहे. पुण्यात सात, तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चार पोलीस ठाणे मंजूर केले आहेत. त्यामुळे असे व्यवसाय बंद करण्याची जबाबदारी कोणाची आहे? इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. हे व्यवसाय बंद झाले नाहीत, तर पोलिसांवर कारवाई केली जाईल. आता सोडणार नाही. कायदा सर्वांना समान आहे. आम्ही कोणताही राजकीय हस्तक्षेप केला नाही, करणारही नाही. पोलिसांनी पोलिसांचे काम करावे.

हेही वाचा >>> पुणे : ‘मिशन मौसम’मुळे मिळणार हवामानाचा अचूक अंदाज जाणून घ्या, केद्र सरकारचा ‘मिशन मौसम’प्रकल्प कसा आहे.

मत-मतांतरे, विचारधारा वेगवेगळी असू शकते. राजकीय पक्षाची व्यक्ती एखाद्या जाती आणि धर्माविरोधात बोलते. त्यामुळे समाजामध्ये तेढ, दुही निर्माण होते. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणे शक्य असेल ती केली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप करण्याची वेळ येते. त्यामुळे भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका. इतके दिवस काही जणांना प्रेम दिले. आधार दिला. आता आम्हाला आधार द्यावा. चुकलो, तर आमचे कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले. आरक्षण मला काढायचे आहे, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशात जाऊन बोलले, हे लोकांनी लक्षात घ्यावे. लोकसभेला जे झाले ते गंगेला मिळाले. आता विधानसभेला आम्हाला आशीर्वाद द्या. महायुतीत मतभेद होऊ देऊ नका, ज्या पक्षाला जागा जाईल त्या पक्षाचे मनापासून काम करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.