ज्येष्ठ संस्कृतज्ञ   डॉ. त्रि. ना. धर्माधिकारी यांचे निधन

संस्कृत भाषेच्या अध्ययनाची त्यांची सुरुवात वडिलांकडे झाली.

पुणे : कृष्ण यजुर्वेदाच्या तैतिरीय संहितेचे संपादन करणारे ज्येष्ठ संस्कृतज्ञ आणि वैदिक संशोधन मंडळाचे माजी सचिव डॉ. त्रिविक्रम नारायण ऊर्फ त्रि. ना. धर्माधिकारी  यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. ते  ९० वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

धर्माधिकारी यांचा जन्म २ मे १९३१ रोजी एरंडोल (जि. धुळे) येथे झाला. संस्कृत भाषेच्या अध्ययनाची त्यांची सुरुवात वडिलांकडे झाली. पुण्यातील वैदिक संशोधन मंडळ या संस्थेतून धर्माधिकारी यांची संशोधक म्हणून कारकीर्द सुरू झाली. १९५७ ते १९९३ अशी ३६ वर्षे ते संशोधक आणि संपादक म्हणून कार्यरत होते. तर, १९६७ ते १९९१ या काळात मंडळाच्या सचिवपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. प्राच्यविद्या क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल धर्माधिकारी यांना राष्ट्रपती पुरस्कार, शृंगेरी शारदा पीठाचा पुरस्कार, वेदरत्न पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. लालबहादूर शास्त्री केंद्रीय विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट. प्रदान केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Death of senior sanskrit scholar dharmadhikari akp