एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्यालाही इंजिन जोडणार

पुणे : पुणे- मुंबईदरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्यांसह पुणेकरांची सर्वात लाडकी गाडी असलेल्या डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचा वेग येत्या काही दिवसांत वाढू शकणार आहे. ‘पुश अ‍ॅण्ड पुल’ या तंत्रज्ञानानुसार गाडीला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला इंजिन जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनच्या प्रवासाचा वेळ ३० ते ३५ मिनिटांनी कमी होऊ शकणार आहे.

‘पुश अ‍ॅण्ड पूल’ या तंत्रज्ञानानुसार यापूर्वी मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या राजधानी, निजामुद्दीनसह काही गाडय़ांना दोन इंजिन जोडण्यात आले आहेत. त्यातून या गाडय़ांचा वेग वाढून प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. त्याच धर्तीवर लाडक्या डेक्कन क्वीनचाही वेग वाढविण्यात येत आहे. दोन्ही बाजूंना इंजिन लावल्यामुळे गाडी कमी वेळेत अधिक वेग पकडू शकेल. त्याचप्रमाणे ब्रेक लावण्याचा कालावधीही कमी होईल. पुणे- मुंबई दरम्यान असलेल्या घाट क्षेत्रामध्येही दोन इंजिनांमुळे गाडीला चांगला वेग देता येणार आहे.

डेक्कन क्वीन पुण्यातून दररोज सकाळी ७.१५ वाजता सुटते. मुंबईत ती पोहोचण्याचा वेळ सकाळी १०.२५ आहे. परतीच्या प्रवासात मुंबईतून ती संध्या.५.१० वाजता निघून पुण्यात रात्री ८.२५ वाजता दाखल होते. पुणे- मुंबई या प्रवासासाठी गाडीला सुमारे सव्वातीन तासांचा कालावधी लागतो. दुहेरी इंजिनमुळे हा कालावधी सुमारे पावणेतीन तासांवर येऊ शकतो. मात्र, त्यासाठी संपूर्ण गाडीला एलएचबी प्रकारातील डबे जोडण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी याबाबत सांगितले, की दुहेरी इंजिनमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रवाशांचा फायदाच होणार आहे. डेक्कन क्वीन १ जूनला नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करते आहे. गाडीच्या वाढदिवशीच पुण्यातून तिला दुहेरी इंजिन जोडून पाठवावे. गाडीच्या डब्यांचे बदल करण्यात यावेत, अशी मागणी आपण रेल्वेकडे केली आहे.