पुणे : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ‘येत्या मंगळवारपर्यंत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील निर्णय होईल,’ असा शब्द अजित पवार यांनी दिल्याची माहिती घाडगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर, ‘राजीनाम्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे. ते सोमवारी मुंबईत येतील. त्या वेळी मी त्यांच्यासमेवत चर्चा करीन. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय होईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात कोकाटे ऑनलाइन रमी खेळत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांतून पुढे आली होती. त्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून सुरू झाली. यासंदर्भात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. त्या वेळी घाडगे यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि घाडगे यांच्यात वाद झाला आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाणही झाली. या पार्श्वभूमीवर, घाडगे यांनी अजित पवार यांची भेट घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी पुण्यात ही भेट झाली.

‘कोकाटे असंवेदनशील कृषीमंत्री आहेत. कोकाटे यांची मंगळवारपर्यंत हकालपट्टी केली नाही, तर तीव्र आंदोलन उभारू,’ असा इशारा घाडगे यांनी दिला. त्यावर, ‘मंगळवारपर्यंत निर्णय घेतला जाईल,’ असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याची माहिती घागडे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीचा मुद्दाही घाडगे यांनी पवार यांच्यापुढे उपस्थित केला. ‘मारहाण का करण्यात आली,’ अशी विचारणाही त्यांनी केली. त्यावर या प्रकाराबाबत पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ‘जी घटना घडली ती चुकीची आहे,’ असे पवार यांनी सांगितल्याचे घाडगे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कठोर कारवाईचे आदेश’

‘मी शुक्रवारी विजयकुमार घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी लातूरमध्ये घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांच्या तक्रारी ऐकून मी तत्काळ लातूरच्या पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले,’ असे अजित पवार यांनी एक्स या माध्यमावर पोस्टद्वारे सांगितले. त्याचप्रमाणे, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री सध्या दिल्ली येथे आहेत. ते सोमवारी मुंबई येथे येतील. त्या वेळी मी मंत्रालयात त्यांच्यासमेवत चर्चा करीन. त्यानंतर कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय होईल.’