scorecardresearch

पिंपरी: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरच निर्णय

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांचे आश्वासन

marathi-bhasha
भारतातील भाषांपैकी मराठी भाषा एक प्रमुख भाषा आहे (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

पिंपरी: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सांस्कृतिक विभाग सकारात्मक आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिले असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

शिवसेनेचे संसदीय नेते गजानन कीर्तीकर, लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार कृपाल तुमाणे यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन रामपाल मेघवाल यांची मंगळवारी भेट घेतली.

मराठी भाषा ही राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा, सर्वसामान्य माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असल्याने मराठी भाषेला  अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. मराठी भाषेस गौरवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अनेक वर्षांपासूनचे मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य, वस्तू देखील भारतीय पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत.

आणखी वाचा- पुणे: शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ

महाराष्ट्रातील मुख्य भाषा मराठी आहे. भारतातील भाषांपैकी मराठी भाषा एक प्रमुख भाषा आहे. महाराष्ट्र, गोव्याची  अधिकृत भाषा मराठी आहे. मातृभाषेच्या संख्येच्या बाबतीत मराठी जगात पंधराव्या तर भारतात चौथ्या क्रमांकावर आहे.  भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते. भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. मराठी भाषा देवनागिरी लिपीत लिहिलेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे २०१३ पासून पत्रव्यवहार केला जात आहे. याबाबतचा प्रस्तावही राज्य सरकारने ८ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याबाबतची फाईल मंत्रालयात तयार आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती केली असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 18:34 IST

संबंधित बातम्या