राज्याच्या काही भागात बुधवारी-गुरूवारी पावसाचा शिडकावा झाला असला तरी पाऊस चांगल्याप्रकारे सक्रिय होण्यास आणखी दहा-बारा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही उघडीप लांबल्यामुळे अनेक भागात काळजीचे वातावरण आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी गुरूवारी हलका पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भाचा बहुतांश भाग मात्र कोरडाच राहिला.
राज्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक भागात पेरण्या खोळंबल्या आहेत आणि ज्या भागात त्या झाल्या आहेत तिथे दुबार पेरण्यांची वेळ आली आहे. त्यामुळे पावसाची चातकासारखी वाट पाहिली जात आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. त्यानंतर गुरूवारी मोजक्या ठिकाणी हलका पाऊस झाला. पुण्यात ०.२ मिलिमीटर, तर सातारा येथे १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण-गोव्यात रत्नागिरी (६ मिलिमीटर), पणजी (२३) येथेही पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाचे वातावरणच नव्हते.
पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले की, येत्या २० जुलैपर्यंत पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे नाहीत. पुढील काही दिवसांत कोकणात काही प्रमाणात पाऊस पडेल. तसेच, विदर्भात एक-दोन दिवस पाऊस असेल. त्यानंतर तेथे विशेष पावसाची शक्यता नाही. राज्याच्या इतर भागातही मोठय़ा पावसाची फारशी शक्यता नाही. २० जुलैनंतरच परिस्थिती बदलू शकेल.
‘प्रशांत महासागरातील वादळांचा परिणाम’
‘‘प्रशांत महासागर व त्याच्या परिसरातील समुद्रांमध्ये निर्माण झालेल्या लागोपाठच्या तीन चक्रीवादळांकडे आपल्याकडील बाष्प गेले. त्याचा विपरीत परिणाम आपल्याकडील मान्सूनच्या पावसावर झाला आहे. दक्षिण गोलार्धातील आद्र्रता वळवली गेली. उत्तर भारतात उत्तर प्रदेश, बिहार येथे मात्र पावसाचा जोर राहील.’’
– डॉ. सुनीता देवी, संचालक, पुणे वेधशाळा
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2015 रोजी प्रकाशित
राज्यात पाऊस सक्रिय होण्यास आणखी दहा-बारा दिवसांची प्रतीक्षा
राज्याच्या काही भागात बुधवारी-गुरूवारी पावसाचा शिडकावा झाला असला तरी पाऊस चांगल्याप्रकारे सक्रिय होण्यास आणखी दहा-बारा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
First published on: 10-07-2015 at 03:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay monsoon farmers