आयआयटी मुंबईतील दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची सखोल चोैकशी करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आली आहे.दर्शनने १२ फेब्रुवारी वसतिगृहात आत्महत्या केली. गुजरातमधील एका दलित कुटुंबातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना वैयक्तिक नाही. त्यामागे काही संस्थात्मक अन्यायाचे मुद्दे असण्याची शक्यता आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य अजित अभ्यंकर आणि जिल्हा समितीचे सचिव गणेश दराडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हैदराबादमधील विद्यापीठात काही वर्षांपूर्वी रोाहित येमुला याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गेल्या काही वर्षांपासून आयआयटीसह देशातील विविध उच्च शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. शिक्षणमंत्र्यांनी संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०२१ या कालावधीत १२२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनांचे सखोल विश्लेषण केल्यास सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे मोठे प्रमाण असल्याचे दिसून येते, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.