पिंपरी : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा माण-हिंजवडी-शिवाजीनगर असा नामविस्तार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यामुळे त्याआधीपासून मागणी होत असलेली पुणे मेट्रोच्या नावात पिंपरीचे नाव समाविष्ट करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) च्या २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या २,४१९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास बुधवारी मंजुरी देण्यात आली. या वेळी झालेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये हिंजवडी मेट्रोच्या नामविस्ताराचा निर्णय समाविष्ट होता. यापूर्वी हिंजवडी ते शिवाजीनगर असे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र, या नावात माणच्या समावेशाची मागणी होत होती. त्याची दखल घेत माण-हिंजवडी-शिवाजीनगर असा नामविस्तार करण्यात आला.

याच धर्तीवर, पुणे मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेख असला पाहिजे, अशी मागणी नव्याने जोर धरू लागली आहे. वास्तविक पुणे मेट्रोची कार्यवाही सुरू झाली, तेव्हापासूनच ही मागणी होत होती. त्यासाठी पिंपरी पालिकेच्या पातळीवर सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन पाठपुरावा केला होता. अनेकदा या मागणीसाठी आंदोलनेही झाली होती. तथापि, मेट्रो व्यवस्थापनाने नामविस्ताराच्या मागणीकडे कधीही गांभीर्याने पाहिले नव्हते. हिंजवडीचा नामविस्तार झाल्यानंतर पिंपरीचा समावेश करून पुणे मेट्रोच्या नामविस्ताराची पुन्हा मागणी होऊ लागली आहे.

पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडचा उल्लेख असला पाहिजे, अशी भूमिका पालिकेतील सत्ताधारी म्हणून भाजपने वेळोवेळी मांडली आहे. त्या दृष्टीने पालिका सभेत ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. पिंपरीसह पुणे मेट्रोचा नामविस्तार झाला पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.

नामदेव ढाके, माजी पक्षनेते, पिंपरी पालिका

पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र अस्तित्व आहे. पुणे महामेट्रोच्या उभारणीसाठी पिंपरी पालिकेचे आर्थिक योगदान आहे. त्यामुळे मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेख अनिवार्य आहे. शहरवासीयांच्या दृष्टीने हा अस्मितेचा प्रश्न आहे.

सचिन साठे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस</strong>