पिंपरी: विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आणिनिकाल शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी – चिंचवड पोलिसांनी सराइत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात येणार्‍या तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०१ गुन्हेगारांना सात दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार केले आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादीचेच बंडखोर, सर्व पक्षांनी पाठींबा दिलेले बापू भेगडे यांच्यात लढत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मावळात गुन्हेगारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्याअखत्यारीत पिंपरी, चिंचवड, भोसरी हे तीन मतदारसंघ तर खेड, मुळशी, मावळ या मतदारसंघाचा काही भाग येतो. सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतप्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.

हेही वाचा >>>भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मावळ विधानसभामतदारसंघात येणार्‍या तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची कुंडली काढण्याचे काम गुंडा विरोधी पथकाकडे सोपविले. गुंडा विरोधी पथकाने चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या १०१ गुन्हेगारांची कुंडली काढली. त्यानुसार, या गुन्हेगारांना १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मावळ तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मतदानासाठी येणार्‍या नागरिकांना धमकावणे तसेच आपल्या दहशतीचा मतदान प्रक्रियेवर प्रभाव पाडणे, असे संभाव्य प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा >>>कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर

यामध्ये तळेगाव दाभाडे ५६, तळेगाव एमआयडीसी ३, देहूरोड ३०, शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांना मतदानाच्या दिवशी म्हणजेच बुधवारी (२० नोव्हेंबर) सकाळी सात ते सकाळी दहा या कालावधीत मतदान करता येणार आहे. मतदान करण्यासाठी येताना त्यांना स्थानिक पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असली तरी त्यांचा राष्ट्रीय कर्तव्याचा अधिकार पोलिसांनी शाबूत ठेवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकीत कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करू नये. जर कोणी नागरिकांना धमकावत असेल तर पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी. संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.