शहरातील पर्वती आणि पद्मावती विभागांतर्गत अनेक ग्राहकांना सदोष वीजदेयके देण्यात येत आहेत. परिणामी संबंधित नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पुणे: “…तर कसबा पोटनिवडणूक लढवणार”; NCP च्या रुपाली पाटील-ठोंबरेंचं विधान! म्हणाल्या, “मुक्ता टिळक यांच्यामुळे मनसेनं…”

आमदार भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. पर्वती, पद्मावती विभागांतर्गत अनेक ठिकाणी ग्राहकांना चुकीची वीजदेयके देण्यात येत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड पडत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. मीटर वाचनात तफावत, संबंधित यंत्रणेकडून होणाऱ्या निष्काळजीपणामुळे चुकीची वीजदेयके येत असून त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असे आमदार तापकीर यांनी निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा >>>पुणे: नवीन मुठा कालव्याला गळती; लाखो लिटर पाणी वाया

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पर्वती, पद्मावती विभागांतर्गत गेल्या तीन महिन्यांत नेहमीच्या वीजदेयकांची टक्केवारी सुमारे ९५ ते ९६ टक्के इतकी आहे. वाढीव वीजदेयकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास ग्राहकांच्या मीटर वाचनाची आणि प्रत्यक्ष वीजवापराची स्थळ तपासणी करून आवश्यकतेनुसार देयक दुरुस्ती करण्यात येते. ग्राहकाला वीजदेयकाबाबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधित ग्राहकाला उपविभागीय कार्यालय, महावितरणचे संकेतस्थळ, मोबाइल उपयोजन (ॲप) इत्यादी ठिकाणी तक्रार नोंदविण्याचे पर्याय उपलब्ध आहेत आणि त्या तक्रारीचे त्वरित निरसन करण्यात येते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रास्ता पेठ शहर मंडळात ऑक्टोबर २०२२ मध्ये पर्वती आणि पद्मावती या विभागात प्रत्येकी एक अशा दोन ग्राहकांना अवास्तव वीजदेयक दिल्याचे निदर्शनास आले होते. संबंधित ग्राहकांची वीजदेयके महावितरण कंपनीच्या नियमानुसार त्वरित दुरुस्त करून देण्यात आली. तसेच याबाबत चौकशी करून संबंधित अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.