पुणे : पुणे पोलीस दलातील एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचा गैरवापर करून पोलीस हवालदाराने सराफाकडून आठ लाख २२ हजार २२० रुपयांचे दागिने खरेदी केले. दागिने खरेदी केल्यानंतर पैशांची मागणी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले.
गणेश अशोक जगताप असे निलंबित केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. हवालदार जगताप यांची पोलीस मुख्यालयातून विशेष शाखेत (स्पेशल सेल) ३१ जानेवारी २०२४ मध्ये बदली झाली होती. ते विशेष शाखेत हजर झाले नाहीत. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२४ पासून ते रुग्णनिवेदन (सीक रीपोर्ट) रजेवर गेले होते. २१ ऑगस्ट रोजी जगताप यांनी भवानी पेठेतील सराफ व्यावसायिकाच्या पेढीतून आठ लाख २२ हजार २२० रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले. दागिने खरेदी करताना जगताप यांनी पोलीस दलातील एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचा गैरवापर केला. सराफ व्यावसायिकाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, तेव्हा जगताप यांनी पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. जगताप यांनी सराफ व्यावसायिकाला जिवे मारण्याचीही धमकी दिली होती.
त्याबाबतची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सराफ व्यावसायिकाने केली होती. जगताप यांचा कर्तव्यात कसुरी केल्याचा अहवाल विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते यांना मिळाला होता. बदली झाल्यानंतर ते विशेष शाखेत हजर झाले नव्हते. जगताप यांचे गैरवर्तन, तसेच बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवून त्यांना विशेष शाखेचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी त्यांना निलंबित करण्याचा आदेश दिला.