ग्रामीण पाणी पुरवाठा योजनेतील पाइप खरेदीचे बील मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून ७० हजारांची लाच घेणाऱ्या उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. भोरमधील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.
जयंत सोपानराव ताकवले असे लाचखोर उपअभियंत्याचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. ताकवले भोर-वेल्हा तालुक्यातील पाणी पुरवठा उपविभागात उपअभियंता आहेत. तक्रारादाराकडून पाणी पुरवठा योजनेसाठी पाइप खरेदी करण्यात आले होते. पाइप खरेदीचे बील मंजुरीसाठी उपअभियंता ताकवले यांच्याकडे पाठविण्यात आले होते. बील मंजुरीसाठी ताकवले यांनी तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती.
हेही वाचा >>> पुणे : हडपसर भागात भरधाव ट्रकच्या धडकेने दोघांचा मृत्यू, अपघातानंतर ट्रक चालक पसार
तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन भोर पंचायत समितीच्या आवारात ताकवले यांनी मंगळवारी दुपारी बोलावले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या ताकवले यांना ताब्यात घेतले. ताकवले यांच्या विरुद्ध भोर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक भारत साळुंके तपास करत आहेत.