पुणे : ‘भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मी सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे,’ असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कायमच पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ओरडतात आणि त्यांना चिथावणी देतात,’ असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये झालेल्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी विधिमंडळ परिसरात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोऱ्हे बोलत होत्या.
‘हाणामारीची सुरुवात पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून झाली का,’ असा प्रश्न विचारता, ‘त्यांच्यात सभागृहामध्ये सुधारणा झाली, असे मला म्हणायचे आहे. सभागृहाबाहेर काय होते, त्यावर मी बोलत नाही,’ असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. ‘उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले, तरी आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत,’ असेही त्या म्हणाल्या.
‘मुख्यमंत्री हिंदीसाठी आग्रही नाहीत’
‘हिंदी भाषेची सक्ती करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते हिंदीसाठी आग्रही नाहीत. या संदर्भात त्यांच्यावर होणारे आरोप तथ्यहीन आहेत,’ असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
काय झाले होते नक्की विधानभवन परिसरात
मुंबई येथे राज्याचे विधानसभा अधिवेशन सुरू होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचे पडसाद उमटले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू शाब्दिक चकमकीनंतर दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ एकमेकांना भिडले. त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी देखील झाली. या घटनेचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपला अहवाल सादर केला. या अहवालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे. विधान भवन परिसरात आमदार आणि त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक वगळता इतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही. कोणत्याही आमदारांचे कार्यकर्ते विधान भवन परिसरात आले आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आमदारावर असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.