“संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी भाषण केले. ते आज आपण ऑडिओच्या माध्यमांतून ऐकले. तशाच प्रकाराच भाषण आज संसदेत करण्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. बाबासाहेबांनी त्यावेळी काय सांगितले तर संकुचित वृत्ती सोडून, आपण सर्वजण एका मार्गाने चालण्याचा विचार केला.तर आपण या देशाला महान बनवू शकतो. आज देश त्याच मार्गाने चालला आहे. पण देशाला काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व संकुचित वृत्तीना मी आवाहन करतो.” अशी भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडत काँग्रेस पक्षाला त्यांनी टोला लगावला.

पुण्यातील सेनापती बापट रोडवरील सिंबायोसिस संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकास केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे,सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शा.ब. मुजुमदार आदी उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखविला आहे.त्या मार्गाने आपण चाललो तर येत्या दहा वर्षात भारत देशाला विकसित म्हणून प्रस्थापित करू शकतो.त्यामुळे मी एक सांगू इच्छितो की देशातील कोणत्याही समस्येच उत्तर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे. हे संविधान तयार करताना स्वातंत्र्य, बंधुता आणि समता हे विचार त्यातून मांडले आहे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “लंडनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर, राज्य सरकारने वतीने विकत घेतलं. केंद्र सरकारकडून मुंबईतील इंदु मीलसाठी मोफत जागा दिली. त्यावेळेस राज्य सरकारारने शंभर कोटी रुपये दिले. आता लवकरच बाबासाहेबांचे स्मारक पुर्ण होईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केला.