पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धेचं १६ ते २९ जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केलं आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीगमध्ये खेळणार असून, मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रेंचायजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे. राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने राज्य स्तरावरील क्रिकेट विश्वात पदार्पण केलं आहे. या लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्स, पुणेरी बाप्पा, ईगल नाशिक टायटन्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स आणि धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हे सहा संघ सहभागी होत आहेत. सर्वच संघांनी आपले आयकॉन खेळाडू नियुक्त केले असून, भारतासाठी १९ वर्षांखालील विश्वचषक खेळणारा तसेच रणजी खेळाडू आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज धाराशिवकर राजवर्धन हंगरगेकर हा छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा आयकॉन खेळाडू असणार आहे. आयपीएलप्रमाणे एमपीएलमध्येही खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावात छत्रपती संभाजी किंग्जने २२ खेळाडू खरेदी केले असून त्यातले ११ खेळाडू हे मराठवाड्यातील आहेत. संघातील सर्व खेळाडूंची आज धनंजय मुंडे यांनी पुण्यातील सहकार नगर भागातील शिंदे हायस्कुलच्या सराव मैदानावर भेट घेतली, तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी स्वतः धनंजय मुंडे यांनी नेट्समध्ये खेळाडूंसह सरावही केला. हे ही वाचा >> “राऊत आणि आव्हाडांनी डीएनए तपासावा”, दंगलींवरून चित्रा वाघ यांचा घणाघात; म्हणाल्या, “औरंग्याची पैदास…” मराठवाड्याचा रणजी ट्रॉफी सारख्या स्पर्धांमध्ये स्वतःचा संघ होऊ शकला नाही, मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मराठवाड्यासह ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना आम्ही संधी दिली आहे. या महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा मूळ उद्देश ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आहे, त्यामुळे मी स्वतः एका संघाची जबाबदारी घेतली आहे. आमचा संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी असेल, असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या हस्ते यावेळी सीएसके (छत्रपती संभाजी किंग्स) संघाच्या लोगोचे अनावरणाही करण्यात आले.