पुणे : ‘पारंपरिक वाद्यवादन करणाऱ्या पथकांवर कारवाई करणार नाही ही पोलिसांची भूमिका स्वागतार्ह असली, तरी मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांच्या वादनातून होणाऱ्या आवाजाच्या मर्यादेची बंधने पाळण्यावरच पथकांचा भर असेल. पोलीस आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करून ‘डीजेमुक्त’ उत्सव साजरा केला पाहिजे’, हीच आमची भूमिका असल्याचे ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

पारंपरिक वाद्यवादन करणाऱ्या पथकांवर या वर्षी खटले होणार नाहीत, अशी ग्वाही पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. याचा अर्थ ढोल-ताशांचा आवाज वाढणार, असा कोणीही काढू शकतो. पण, पोलीस प्रशासन आवाजाची जी मर्यादा घालून देते, त्याचे पालन करण्यावरच ढोल-ताशापथकांचा कटाक्ष असतो. ढोल-ताशापथकांची ही संस्कृती परदेशात लोकप्रिय होत असताना आपल्याला येथे परवानगीचे खेळ खेळावे लागतात. यामध्ये सुसंवादातून चांगला मार्ग निघू शकतो, याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.

ठाकूर म्हणाले, ‘गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत एका चौकात चार मिनिटे वेळ झाला म्हणून एका पथकाच्या वादकांवर खटले दाखल झाले होते. त्या पथकातील कार्यकर्त्यांना पारपत्र मिळण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मागणीला पोलीस सहआयुक्तांनी खटले दाखल करणार नाही, असा सकारात्मक प्रतिसाद दिला. जेथे निवासी क्षेत्र नाही अशा नेहरू स्टेडिअम, सणस मैदान यांसारख्या ठिकाणी सरावासाठी ढोल-ताशापथकांना जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी शुल्क भरण्याची आणि रात्री दहापूर्वी सराव संपविण्याची पथकांची तयारी आहे. उत्सव डीजेमुक्त करावयाचा असेल, तर केवळ पुण्याचीच नाही तर महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या ढोल-ताशावादनकलेला प्रोत्साहन दिले पाहिजे.’

पर्यावरणवादी वर्षभर कोठे जातात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गणेशोत्सव आल्यानंतर पर्यावरणवादी जागे होतात का? गणेश विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशावादन असो किंवा गणेशमूर्तीचे विसर्जन; त्यामुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार केली जाते. पर्यावरणवादी वर्षभर जातात कुठे’, असा सवाल पराग ठाकूर यांनी उपस्थित केला. ‘गणेशोत्सवाच्या परंपरेमध्ये लोक रमतात. या उत्सवातून संघभावना शिकतात. हा उत्सव कार्यकर्ते घडविणारी कार्यशाळा आहे. अनेकांना रोजगार मिळतो. या वर्षीच्या उत्सवातून एक लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माणसांना समृद्ध करणाऱ्या या उत्सवाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे,’ याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.