‘एकाग्र होऊन एखादे काम करण्यासाठी जे लागते तशीच एकाग्रता ढोल-ताशाच्या वादनात आहे. दिवसभर नोकरी करणाऱ्या मुलामुलींचे वादनासाठीचे ‘पॅशन’ देखील वाखाणण्यासारखे आहे. हे वादन ध्यान करण्यासारखेच आहे,’ असे मत प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांनी व्यक्त केले.
वंदेमातरम संघटनेच्या युवा वाद्य पथकातर्फे शहरातील सर्व पथकांच्या वाद्यांचे शंकर महादेवन यांच्या हस्ते रविवारी पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. संघटनेचे वैभव वाघ व इतर पथकांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते. या वेळी प्रसाद भारदे यांनी शंकर महादेवन यांची मुलाखत घेतली. संगीतकार म्हणून सगळ्यात अवघड गोष्ट कोणती वाटते, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘अश्लील किंवा द्वयर्थी शब्द वापरुन ‘आयटम साँग’ करा, अशी मागणी माझ्याकडेही होत असते. असे गाणे लिहून देणारे लेखक मला मिळतील, कदाचित ते गाणे ‘इन्स्टंट हिट’ होईल, पण मला ते माझ्या १२ वर्षांच्या मुलाबरोबर बसून पाहता येईल का, असे गाणे तयार केल्यावर मला रात्री झोप लागेल का, असा विचार मी करतो.’
तरुणांना करिअरविषयी सांगताना ते म्हणाले,‘नोकरी करायला लागल्यावर आपल्याला तिथेच सुरक्षित वाटू लागते. मी संगणक अभियंता म्हणून नोकरी करत होतो, पण अगदी अठरा तासांपर्यंत कोणते काम केल्यानंतर मला थकवा येणार नाही, या प्रश्नाचे उत्तर संगीतच होते. ज्या क्षेत्रात तुम्ही पारंगत आहात आणि जिथे तुम्हाला आनंद मिळतो त्या क्षेत्रात बिनधास्त घुसा.’
वाद्ये वाजवणे चूक नाही, पण..

‘ढोल-ताशाचे वादन हे राष्ट्रीय वारसा जतन करण्यासारखे आहे. जगभरात वेगवेगळ्या उत्सवांना, कार्निव्हल्सना त्यांची त्यांची वाद्ये वाजवली जातात. मग आपल्याकडे आपली वाद्ये वाजवण्यात चूक काय? गणेशोत्सवात ढोल- ताशा पथकांचे वादन होणे समजून घ्यायला हवे. पण पथकांनीही योग्य जागा पाहून सराव करावा,’ असे मत शंकर महादेवन यांनी व्यक्त केले.

‘खळेकाका देशातील सर्वोत्तम संगीतकार’
संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याबद्दल बोलताना शंकर महादेवन म्हणाले, ‘खळेकाका आपल्या संगीतातून शब्दांना योग्य न्याय द्यायचे. ते देशातील सर्वोत्तम संगीतकार आहेत. त्यांच्यासारखे दुसरे कुणीही नाही. मला वयाच्या अकराव्या वर्षीच्या त्यांच्या अल्बममध्ये वीणा वाजवण्याची संधी मिळाली. आम्ही केवळ गुरू- शिष्यच नव्हे, तर मित्रही होतो.’