पुणे : ‘वैज्ञानिक चमत्कारामुळे मानवी आयुर्मान शतायुषी झाले असले, तरी प्रत्येक माणूस चार-पाच आजार घेऊन जगत आहे. त्यामुळे वेळीच आत्मअनुशासनाचा अवलंब करून वाटचाल करणे महत्त्वाचे आहे,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.डॉ. अभय बंगलिखित व राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘आरोग्य स्वराज्य’ या पुस्तकाचे आणि ‘या जीवनाचे काय करू?’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी ज्येष्ठ प्रकाशक, लेखक दिलीप माजगावकर, ‘राजहंस प्रकाशन’च्या संपादक करुणा गोखले, प्रेक्षकांतून निवडलेल्या भाग्यवान वाचक साक्षी भोसले, डॉ. कल्याणी मांडके आणि अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक रसिका राठिवडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डाॅ. बंग बोलत होते.
डाॅ. बंग म्हणाले, ‘आधुनिकीकरणाच्या नावाखाली जीवनशैली बदलली आहे. प्रौढांमध्ये हृदयरोगासह असंसर्गजन्य आजारामुळे ५० टक्के मृत्यू होत आहेत. कुपोषण आणि आजारांवर आरोग्यसेवा वेळेवर न मिळाल्याने आदिवासी पाडे, झोपडपट्ट्यांमध्ये लहान मुलांचे मृत्यू होत आहेत. वैद्यकीय उपचारांच्या उपलब्धतेमुळे आयुर्मान वाढले आहे. पण, पूर्वीच्या देवी, कॉलरा या संसर्गजन्य आजारांची जागा आता असंसर्गजन्य आजारांनी घेतली आहे. प्रत्येक माणूस चार ते पाच आजार घेऊन जगत आहे. व्यसन, व्यायामाचा अभाव, चटपटीत खाद्यपदार्थांचे ग्रहण ही प्रमुख कारणे घातक ठरत आहेत.’ विशेषतः दहावी-बारावीच्या मुलांमध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आधी विकार वाढले असून याला बदलती जीवनशैली कारणीभूत आहे, असे डॉ. बंग यांनी अधोरेखित केले.
‘जगातील शताय़ुषी आयुर्मान असलेल्या देशांमध्ये जपान अग्रस्थानी आहे. भारतात सरासरी आयुर्मान ७० वर्षांपर्यंत आहे. या सत्तर वर्षात चार-चार रोग घेऊन माणूस जगतो आहे. त्यामुळे आरोग्यातील महागड्या सेवा, उपचार, तंत्रज्ञान माफक आणि सुलभ दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केल्यास जीवनमान नक्कीच उंचावू शकेल,’ असा विश्वासही डाॅ. बंग यांनी व्यक्त केला.
डॉ. कल्याणी मांडके, करुणा गोखले यांनीही मनोगत व्यक्त केले.
माणसाला शतायुषी करण्यासाठी विज्ञानाने अनेक चमत्कार दाखवले आहे. परंतु, त्यासाठी लागणारा आर्थिक खर्च मोठा असून पाश्चात्त्य देशांमध्ये याची सुरुवात झाली आहे. त्यात पाश्चात्य देशाचे अनुकरण भारतात होऊ नये म्हणून सरकारने प्रयत्न करावे. जेणेकरून सर्वसामान्यांनाही याचा लाभ मिळेल, असे आवाहन डॉ. बंग यांनी केले.
