मधुमेहावर वापरल्या जाणाऱ्या ‘पिओग्लिटाझोन’ या औषधावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अचानक घातलेल्या बंदीमुळे आधीपासून हे औषध वापरत असलेले रुग्ण गोंधळात पडले आहेत. शरीरात तयार होणाऱ्या इन्शुलिनला त्याचे कार्य करण्यासाठी चालना देणारे पिओग्लिटाझोन बंद झाल्यामुळे रुग्णांना इन्शुलिनच्या इंजेक्शनवर किंवा महागडय़ा पर्यायी औषधावर अवलंबून राहावे लागत आहे.
पिओग्लिटाझोनला पर्याय म्हणून इन्शुलिन किंवा ‘ग्लिप्टिन्स’ हे औषध वापरले जाते. हे दोन्ही पर्याय महागडे असल्याने रुग्णांचा खर्च वाढला आहे. पिओग्लिटाझोन औषधाच्या काही ब्रँड्सच्या गोळ्या प्रत्येकी ३ ते ५ रुपये इतक्या स्वस्त होत्या. तर ग्लिप्टिन्सची एक गोळी सुमारे ४० ते ५० रुपयांना आहे.
देशात सुमारे तीस ते पन्नास लाख रुग्ण पिओग्लिटाझोन घेत होते. औषधाच्या दुष्परिणामांचे कारण देऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जूनअखेरीस या औषधावर बंदी आणली. मधुमेहावर देशात सुमारे सहा प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. रुग्णाच्या आजारानुसार या औषधांची ‘काँबिनेशन्स’ तज्ज्ञांद्वारे सुचवली जातात. या सहा प्रकारांमधील एक महत्त्वाचे औषध बंद झाल्यामुळे परस्परपूरक औषधे निवडण्यात पोकळी निर्माण झाली आहे.
पिओग्लिटाझोनच्या दुष्परिणामांमध्ये मूत्राशयाचा कर्करोग आणि हृदयक्रिया बंद पडणे हे दोन दुष्परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत. पण रुग्णाला हे औषध देताना त्याच्या आजाराचा सर्वसमावेषक विचार केल्यास दुष्परिणाम टाळता येऊ शकतात, असे मत व्यक्त करत काही मधुमेहतज्ज्ञांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मधुमेहतज्ज्ञ डॉ. अभय मुथा म्हणाले, ‘‘प्रत्येक औषधाचा काहीतरी दुष्परिणाम असतोच. तज्ज्ञांनी रुग्णांना औषध देताना ठोस मार्गदर्शक तत्त्वे पाळल्यास हे दुष्परिणाम टाळले जातात. थेट हृदयक्रिया बंद पडण्याशी या औषधाचा संबंध नाही. ज्या रुग्णांना हृदयविकार आहे त्यांना हे औषध देताना डॉक्टरांनी काळजी घ्यावी, असा अर्थ अभिप्रेत आहे. या औषधावर अचानक बंदी घालण्यापूर्वी त्याच्या दुष्परिणामांबाबत केंद्रीय स्तरावर शास्त्रीय संशोधन होणे आवश्यक होते.’’
मधुमेहतज्ज्ञ डॉ. गौरी दामले म्हणाल्या, ‘‘शरीरातील इन्शुलिनच्या कार्याला चालना देण्यासाठी पिओग्लिटाझोनचा चांगला उपयोग होतो. पण इतर औषधांच्या तुलनेत त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत. या औषधाचा अल्प प्रमाणातील डोस वापरला तर त्याचा अपेक्षित परिणामही कमी होत असल्याचे दिसून आले आहे. आपण घेत असलेल्या औषधाबद्दल सजग असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. एकदा बरे वाटू लागले की रुग्ण महिनोनमहिने डॉक्टरकडे फिरकत नाहीत. पुन्हा पुन्हा डॉक्टरांची फी देणे परवडत नसल्याने औषधे आणण्यासाठी जुनीच चिठ्ठी रुग्णांकडून वापरली जाऊ शकते. या गोष्टी दुष्परिणामांसाठी कारणीभूत ठरू शकतात. ग्रामीण भागात औषधाच्या दुष्परिणामांचे सखोल ज्ञान असलेले तज्ज्ञ उपलब्ध होतातच असे नाही. या औषधावरील बंदीसंदर्भात या गुंतागुंतीच्या गोष्टीही विचारात घेण्याजोग्या आहेत.’’